

पालघर: लाकडाच्या भुश्याच्या गोण्यांच्या आड लपवून विदेशी मद्याची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत उघड झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धुंदलवाडी परिसरात दारू तस्करांनी वापरलेली शक्कल उधळून लावत दारूचा मोठा साठा जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले. कारवाईत १८.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या दापचरी तपासणी नाका पथकाने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धुंदलवाडी उड्डाणपुलाच्या परिसरात संशयीत महिंद्रा पिकअप टेम्पो थांबवून टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये लाकडाच्या भुश्याच्या गोण्यांच्या आड दमण बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत टेम्पो मधील १०३७.५२ बल्क लिटर दमण बनावटीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. कारवाईत १८.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेम्पो चालक संजू बिंद याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे सीमा भागातील दारू तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का आहे.एकूणच दिवसेंदिवस वाढणार्या दारू तस्करी विरोधात पोलिसांनी मोहिम अधिक तिव्र केली आहे.
तस्करीवर लगाम
पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील सिल्वासा केंद्र शासित प्रदेशातून महाराष्ट्रात दारू तस्करी करताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चकमा देण्यासाठी दारू माफियांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात.कधी लाकडाच्या भुश्याच्या गोण्यांचा तर कधी वाहनां मध्ये छुपे कप्पे तयार करून दारू तस्करी केली जाते.उत्पादन शुल्क विभागाच्या सतर्कतेमुळे आणि गोपनीय माहितीमुळे दारू माफियांचे क्लुप्त्या उघड्या पाडण्यात यश येत आहे.