ठाणे

डोंबिवली स्फोटात निष्पापांच्या बळीला कारणीभूत ठरलेले माय-लेक सापडले 

अविनाश सुतार
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमधील मे. अमुदान केमीकल्स कंपनीमध्ये गुरूवारी झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटात ८ जणांचा बळी गेला आहे. जीवित व वित्तहानीच्या या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंपनीच्या बेजबाबदार मालकावर ठाण्याच्या क्राईम ब्रँचसह स्पेशल टास्क फोर्सने अटकेची कारवाई केली. तर त्याची आईलाही नाशिकमधून ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली एमआयडीसी स्फोटप्रकरणी आतापर्यंत कोणती कारवाई केली?

  • कंपनीच्या मालकाला ठाण्याच्या क्राईम ब्रँचसह स्पेशल टास्क फोर्सकडून अटक
  • आईलाही नाशिकमधून ताब्यात घेतले आहे.
  • दोघा माय-लेकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मलया प्रदीप मेहता (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या मालकाचे नाव असून तो घाटकोपर येथील आर मॉलजवळ असलेल्या कल्पतरू आवरा सोसायटीत राहणारा आहे.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीच्या मालकीण मालती प्रदिप मेहता, मुलगा मलय मेहता यांच्यासह कंपनीचे संचालक, व्यवस्थापक, देखरेख अधिकाऱ्यांसह इतर बेजबाबदार व्यक्तींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलिसांसह ठाण्याच्या क्राईम ब्रँचच्या अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त पराग मणेरे आणि शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे, स्पेशल टास्क फोर्सचे सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे, पोलिस निरीक्षक वनिता पाटील, सपोनि सुनील तारमाळे, सपोनि श्रीकृष्ण गोरे, फौजदार विजय राठोड, आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. या पथकाने तपासचक्रांना वेग देऊन मलया मेहता याला अटक केली.
कंपनीत स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या कंपनीच्या मालकीण मालती प्रदीप मेहता (70) सायंकाळी नाशिकला गेल्या. नाशिकमध्ये त्यांनी नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता. तथापी क्राईम ब्रँचने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली. सद्या या दोघा माय-लेकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतर या दोघा माय-लेकाला मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT