Woman murdered for property pudhari photo
ठाणे

Thane Crime : वारसदार बनण्यासाठी आधी सह्या, मग महिलेचा खून!

एलआयसीच्या बहाण्याने बोलावले; संपत्ती हडपण्याच्या कटातून हत्या, मृतदेह नाशिक महामार्गावर फेकला

पुढारी वृत्तसेवा

ठाणे/ डोंबिवली : संपत्ती हडप करण्यासाठी ५३ वर्षीय अविवाहित महिलेला एलआयसी पॉलिसी काढण्याच्या बहाण्याने बोलावून, तिच्याकडून वारसदार घोषित करणाऱ्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेतल्यानंतर नाक-तोंड दाबून हत्या केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा युनिट-३ (कल्याण)च्या पथकाने दिगंबर भागुजी आव्हाड (४८) आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी (५२) यांना अटक केली असून पुढील तपासासाठी त्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मृत महिला संगिता मारुती चंदनशिवे (५३, रा. मोहने, आंबिवली) या अविवाहित होत्या. १४ जुलै २०२६ रोजी त्या घरच्यांना शहापूर येथे एलआयसीचे काम असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या; मात्र त्या परतल्याच नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद लागत असल्याने त्यांचे भाऊ प्रवीण चंदनशिवे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

तपास सुरू असतानाच १६ जुलै रोजी मेडिकल कॉलेजसमोरील सिन्नर-घोटी मार्गालगत, नाशिक रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळला. वाडीव-हे पोलीस ठाणे (नाशिक ग्रामीण) येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हा मृतदेह बेपत्ता झालेल्या संगीता चंदनशिवे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची सूत्रे हलवली. संशयावरून दिगंबर भागुजी आव्हाड (रा. पॅन्टॉगॉन बिल्डिंग,आसनगाव) आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी ( एनआरसी कॉलनी, मोहने, आंबिवली) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक कट उघड झाला. चौकशीत आरोपींनी संतोष रमेश जाधव ( ४०, रा. शनी मंदिरामागे, पेठ रोड, नाशिक) आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे (रा. मोहने, आंबिवली) यांच्या संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींनी एलआयसी पॉलिसी काढण्याच्या बहाण्याने संगीता चंदनशिवे यांना आसनगाव येथे बोलावून घेतले. त्यानंतर दिगंबर आव्हाड याने भाड्याने घेतलेल्या घरात नेऊन त्यांच्या मालमत्तेबाबतचे कागद तयार करण्यात आले. त्या कागदांमध्ये दिगंबर भागुजी आव्हाड आणि तुषार मुरलीधर रत्नपारखी यांचा मृत्यूनंतर वारसदार म्हणून उल्लेख करण्यात आला. त्यासाठी संगीता चंदनशिवे यांना मारहाण करून जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे नाक आणि तोंड दाबून हत्या करण्यात आली.

हत्येनंतर आरोपींनी मृतदेह कारमध्ये टाकून सिन्नर-नाशिक महामार्गालगत फेकून दिल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नाशिक ग्रामीणच्या वाडीव-हे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

एटीएममधील पैसे काढताना सीसीटीव्हीत आरोपी ट्रॅप

तपासात धक्कादायक माहिती समोर आली. यातील मुख्य आरोपी तुषार मुरलीधर रत्नपारखी (४२) हा संगिता यांचा भाऊ रवींद्र चंदनशिवे यांच्या गाडीवर दोन वर्षे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानेच आपल्या मित्रांसह संगिता चंदनशिवे यांच्या खुनाचा कट रचला. अपहरणकर्त्यांनी संगिता यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्ड ताब्यात घेतले. त्यानंतर प्रमोद पांडे आणि तुषार रत्नपारखी यांनी एटीएममधून प्रथम ५००० आणि नंतर ४००० असे एकूण ९००० रूपये काढले. याच एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे क्राईम ब्रँचने खुन्यांचा माग काढला.

अत्यंत क्लिष्ट आणि किचकट गुन्ह्याचा उलगडा

संगिता चंदनशिवे यांच्या अत्यंत क्लिष्ट आणि किचकट गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त डॉ. पंजाराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोनि महेश काळे, सपोनि गणेश दळवी, पोउनि किरण भिसे, सपोउनि बालाजी शिंदे, सपोउनि दत्ताराम भोसले यांच्यासह उल्हास खंदारे, सुधीर कदम, सचिन कदम, विलास कडू, अदिक जाधव, गोरखनाथ पोटे, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, पांडुरंग भांगरे, सचिन भालेराव, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, सतिश सोनवणे, विनोद चन्ने, गोरक्ष शेकडे, गणेश हरणे, मिथून राठोड, जालिंदर साळुखे, मंगला गावीत, चालक सपोउनि अमोल बोरकर या पथकाने तपासचक्रांना वेग दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT