Turnover of 500 crores in unauthorized constructions
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
न्यायालयाच्या दणक्यानंतर शीळ भागात झालेल्या १७ अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या बांधकामांबाबत सुरू असलेल्या चौकशीमधून समोर आल्या आहेत. या १७ बेकायदा बांधकामांमधून ५०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत असून बेकायदा बांधकामांसाठी किती पैसे घ्यायचा याचे एक दरपत्रक तयार केले होते.
ज्यामध्ये पालिका अधिकाऱ्यांकडून प्रति चौरस मीटर २०० रु. दर आकारला जात होता असा दोषारोप करण्यात आला आहे. मुंब्रा शिळफाटा येथील खान कंपाउंड परिसरात झालेल्या १७ बेकायदा इमारतींवर ठाणे पालिकेकडून कारवाई सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयुक्त सौरभ राव व न्यायालय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेल्या कारवाईत आतापर्यंत १७ पैकी १० इमारती जमीनदोस्त करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
१७ बेकायदा इमारतींमधील प्रत्येक इमारतीमध्ये १५० सदनिका असून यामध्ये जवळपास ५०० कोटींची उलाढाल झाली असून हा सर्व व्यवहार रोख झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याचिकाकर्त्यांनीही या प्रकरणावरून पालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पालिका अधिकारी बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामास आश्रय देत असल्याचा दोषारोप ठेवला आहे. त्यांनी बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामासाठी दरपत्रक निश्चित केले होते.
हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. प्रथमदर्शी लोकांची फसवणूक झालेली दिसते. आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देऊ.सागर कदम, याचिकाकर्त्यांचे वकील