तुकाराम मुंढेंबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक pudhari photo
ठाणे

Kalyan Crime : तुकाराम मुंढेंबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक

कल्याणाच्या खडकपाडा पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यात ठिकठिकाणी धाडी टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांचे अड्डे उध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. मुंढे यांच्या आक्रमक कारवायांमुळे गोरखधंदे करणाऱ्यांची पळता भुई थोडी झाली आहे. भेसळविरूद्ध आक्रमक मोहीम राबविणाऱ्या मुंढे यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या कल्याणमधील एकाला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांनी राज्यातील हॉटेल, स्वीट मार्ट, पानटपरी आणि विविध उत्पादन कंपन्यांवर भेसळविरोधी धाडींचा धडाका लावला आहे. त्यांच्या या कारवाईमुळे पनीर, मावा, गुटखा आणि इतर भेसळयुक्त पदार्थांची बेकायदा विक्री करणाऱ्यांची मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक वर्षे उघडपणे सुरू असले हे गोरखधंदे बंद पडल्याने असे धंदे करणारे व्यावसायिक संतप्त झाले आहेत. याच संतापातून कल्याणमधील दुर्गाप्रसाद पांडे नामक इसमाने मुंढे यांना उद्देशून एक अश्लील शिवीगाळ असलेला आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केला.

या व्हिडिओमध्ये पांडे म्हणतो की, लहान टपरीवाले आणि स्थानिक विक्रेत्यांना त्रास देण्यापेक्षा मोठ्या भेसळ करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी. लहान दुकानांवर धाडी टाकून मोठ्या कारवाईचा देखावा करू नये. बाहेरून येणारा प्रतिबंधित गुटखा आणि भेसळयुक्त माल रोखण्याची ताकद असल्यास दाखवावी. अशांवर कारवाया केल्यास मी तुमचे पाय धुऊन पिईन. त्यानंतर त्याने मुंढे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी शोध घेऊन संबंधित इसमाचा ताब्यात घेतले. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुग्धजन्य पदार्थ, शीतपेये, मद्य, सौंदर्यप्रसाधने यांच्यात मोठ्या प्रमाणात भेसळ करून त्याची खुलेआम विक्री होत होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र यापूर्वी अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी राज्यभरात छापे टाकण्यास सुरूवात केली. दररोज लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करून नष्ट करण्यात आला. या कारवाईच्या धसक्याने हॉटेल आणि स्वीट मार्ट चालकांनी पनीर आणि माव्या सारखे संशयास्पद घटक ठेवणे बंद केले आहे.

अटक आरोपीही गोरखधंद्यातील असल्याचा संशय

प्रत्येक पानटपरीवर विकल्या जाणाऱ्या प्रतिबंधित गुटख्यावरही धडक कारवाई झाली आहे. मुंढे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक वर्षे बिनबोभाट सुरू असले भेसळीचे धंदे कोलमडले आहेत. त्यामुळे या धंद्यांवर उपजीविका असणारे अनेक व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवरच कल्याणच्या दुर्गाप्रसाद पांडे या व्यावसायिकाने संतापातून मुंढे यांच्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी देखील गोरखधंद्यातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिस त्या दिशेने चौकस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT