डॉ. महेश केळुसकर
मागाठाण्याचे सन्माननीय आमदार प्रकाश सुर्वे यांनी ‘माय मरो आणि मावशी जगो’ या जुन्या म्हणीचा उपयोग हिंदी भाषकांची तरफदारी करण्यासाठी केला आणि मराठीचा अपमान झाल्याची भावना मराठी भाषकांमध्ये पसरली. मराठी माझी आई असली तरी उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी मावशी जगली पाहिजे कारण ती आईपेक्षाही जास्त प्रेम करते, असं वक्तव्य त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं. बोलताना काळजी न घेतल्यामुळे आमदार महोदयांच्या वक्तव्याचा अर्थ, मराठी मरो आणि हिंदी जगो, असा घेण्यात आला आणि एकच गदारोळ झाला. त्यानंतर त्यांनी मराठी भाषकांची माफी मागितली आणि ह्या प्रकरणावर कसाबसा पडदा पडला.
सध्याच्या काळात भाषा हा एक संवेदनशील विषय झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा मनोदय शासनाने जाहीर केला आणि त्यावेळीही प्रचंड जनक्षोभाला धोरणकर्त्याना सामोरं जावं लागलं. मग डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती नेमण्यात आली.
या समितीने राज्यभर दौरा केला आणि विविध भाषा अभ्यासकांची आणि संस्थांची मतं जाणून घेतली. अलीकडेच डॉ. जाधव यांनी पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याला राज्यातील 95 टक्के लोकांचा विरोध आहे, असं जाहीर केलं. 20 डिसेंबरला त्रिभाषा समिती जेव्हा आपला अहवाल अधिकृतपणे शासनाला जाहीर करील तेव्हा या संदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होईल. तथापि पहिलीपासून हिंदीचे अध्ययन आणि अध्यापन लागू करण्याचा शासनाचा निर्णय आता रद्दबातल होईल असं वाटतं.
कोणत्याही समाजाची घडण भाषेतून होत असते आणि आपापल्या भाषेबाबत तो तो समाज अत्यंत संवेदनशील असतो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उदाहरणार्थ एस्किमो लोकांच्या बोलीत बर्फासाठी, लॅप्प लोकांच्या सामी बोलीत रेनडियरसाठी, भिल्लांच्या बोलीभाषेत दारूसाठी, कोकणी बोलीत माशांसाठी आणि अहिराणी बोलीत शेती व प्राणीमात्रांसाठी अनेक शब्द आढळतात. इतर बोलींच्या तुलनेने विशिष्ट बोलीत एखाद्या वस्तू /प्राणी /वनस्पती वाचक शब्दांचे बारकावे अधिक आढळतात. त्याचं कारण त्या त्या समाजाची विशिष्ट सामाजिक जीवनसरणी.
उदाहरणार्थ, एस्किमो लोकांना बर्फाचे विविध प्रकार ओळखणं गरजेचं असतं कारण त्याचं जीवन बर्फाशी निगडित असतं. म्हणून बारीक बर्फ, कोरडा बर्फ, मऊ बर्फ, ठिसूळ बर्फ, टणक बर्फ इत्यादीसाठी त्यांच्या बोलीत शब्दांचं वैविध्य आढळतं. लॅप लोक बर्फाळ प्रदेशात फक्त रेनडियरची शिकार करून जगतात. रेनडियरच्याच कातडीचे कपडे, त्याच्या हाडांच्या सुया, बरगड्यांच्या स्नायूंपासून दोरे तयार करतात.
रेनडियरचंच तऱ्हेतऱ्हेचं मांस खातात. त्यामुळे सामी बोलीत रेनडियरशी निगडित शब्दकोश समृद्ध आढळतो. बदाऊन लोकांच्या अरेबिक भाषेत उंटासाठी बरेच शब्द आढळतात. कोकणी/मालवणी लोकांच्या बोलीत माशांचे प्रकार सांगण्यासाठी झिंगे, सोडे, बोंबील, सुरमय, कोळंबी, बांगडा असे कितीतरी शब्द येतात.
भाषा आणि त्या त्या समाजाची संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो. भिल्ल समाजामध्ये जन्म, लग्न आणि मृत्यूसमयी सामूहिकपणे दारू पिणे हा आपल्या समाज संस्कृतीचा ते भाग मानतात. प्रत्येक सण-उत्सवालाही दारू लागतेच. त्यामुळे भिल्ली बोलीत दारूला अठरा शब्द आहेत. हेलो नोवेसागऱ्या, फुलसीसी, होऱ्यो, राही होरो, खाटागुल्या होऱ्यो, सेवड्यागुल्या होरो, बरांडी, रमू, ताडी इत्यादी.
भाषा ही मानवाच्या सामाजिक अस्तित्वाची खूण आहे. या पृथ्वीवर अनंत प्राणीमात्र आहेत. पण त्यांना मनुष्य समाजासारखा सांस्कृतिक इतिहास नाही. याचं कारण भाषा सामाजिक आदान प्रदानाचं माध्यम ,भावनिक ऐक्याचं प्रतीक, सुक्ष्मातिसूक्ष्म ज्ञान व्यवहार पेलण्याची क्षमता, सृष्टी आणि मानव यातील आंतरिक देवघेवींचे मध्यस्थ, कला कल्पनांचे द्रव्य अशा अनेक पातळ्यांवर भाषेवरच माणसाला विसंबून राहावं लागतं. भाषेखेरीज संस्कृती अस्तित्वात येऊ शकत नाही. माणसाची अनुभव घेण्याची प्रक्रिया, त्या पाठीमागील त्याचा दृष्टिकोन आणि त्याची अभिरुची या सर्वांच्या खुणा भाषेत आढळतात.
भाषा ही मूलतः एक सामाजिक प्रक्रिया असल्यामुळे माणसाच्या सांस्कृतिक इतिहासातील स्थित्यंतरांचा आलेख भाषिक अध्ययनातून मांडता येऊ शकतो. त्याने निर्माण केलेल्या साहित्याचं उदाहरण इथं पाहता येईल. आदिम समाजाच्या वाङ्मयात सांघिक आविष्काराला, आम्हीला प्राधान्य आढळतं. या उलट जसजशी उत्पादन साधनांवर माणसाची पकड घट्ट होऊ लागली, त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास वाढत गेला, तसतशा साहित्यातून आम्हीच्या ऐवजी ‘मी’ च्या भाषेत जाणिवा शब्दबद्ध होऊ लागल्या.
साहित्यातील या ‘मी’ व ‘आम्ही’वरून त्या त्या भाषिक समाजाच्या अंतरंगाच्या वास्तवाचा अंदाज बांधता येतो. भाषा आणि समाज यातील परस्पर संबंध अतिशय घनिष्ठ असतात. त्यामुळे बोलणाऱ्या व्यक्तीच्या भाषेतून समाजच प्रगट होतो. उदाहरणार्थ एकदा विधिमंडळात अर्थव्यवस्था कुंठीत झाली आहे, या विषयावर दोन आमदार मतं प्रतिपादन करीत होते.
पहिला आमदार : आपल्या अर्थव्यवस्थेचं विमान रन वे वरच फिरतंय. या सरकारच्या हयातीत टेक ऑफ स्टेज येण्याची शक्यता दिसत नाही.
दुसरा आमदार : आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा चिखलात रुतून पडला आहे. आणि दिवसेंदिवस तो अधिकच खोलात चालला आहे. दोन्ही आमदारांच्या भाषांवरूनच त्यांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात येते. पहिला आमदार शहरी व मध्यमवर्गीय आहे. तर दुसरा ग्रामीण भागातला आहे, हे सहज लक्षात येतं.
राजकारणी लोकांची भाषा वैशिष्ट्यपूर्ण असते. वाटाघाटी फिस्कटल्या, असं ते म्हणत नाहीत. वाटाघाटी स्नेहपूर्ण झाल्या व पुन्हा जमायचं ठरलं, असं सांगतात. राजकारणी कधीही कुणाला नकारात्मक भाषेत सहसा उत्तर देत नाहीत. बघू, करू, लक्ष घालतो अशा भाषेत उत्तर देण्याची त्यांना सवय असते. लोकभाषेचा राजकीय विश्लेषणासाठी चातुर्याने वापर करण्याची राजकारणी लोकांची शैली वैशिष्ट्यपूर्ण असते. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांची भाषा.
डंकेल प्रस्ताव आणि जागतिकीकरणाविषयी फारसा अभ्यास न करता त्याचं स्वागत करणाऱ्या उतावीळ राजकारण्यांना उद्देशून ते म्हणाले होते की, हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी. लोकनेता आणि त्यांची भाषा यांच्यातअसे घनिष्ठ भाषिक संबंध नांदत असतात. अलीकडे मात्र राजकारण्यांच्या भाषेचा स्तर दिवसेंदिवस खालावत चाललाय आणि तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय झालाय.
मराठी भाषक समाज हा महाराष्ट्रातील व बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषकांचा मिळून एकत्रितपणे ओळखला जातो. प्राधान्याने महाराष्ट्रातील मराठी भाषक आणि अनुषंगाने बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषक समाज असा काहीसा तरतमभाव वर्गीकरणाच्या सोयीसाठी करता येईल.
बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषक समाजावर त्या त्या प्रदेशातील भाषा वैशिष्ट्यांचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ हैद्राबाद (संस्कृत मिश्रित मराठी), इंदोर-ग्वाल्हेर (हिंदी मिश्रित मराठी), तंजावर (संस्कृत-तेलुगु मिश्रित मराठी), बडोदा (गुजराती मिश्रित मराठी) मॉरिशस (हिंदी मिश्रित मराठी). आपण मराठी भाषक आहोत, या अस्मितेनं हा समाज एकात्म झालेला आढळतो. भाषा आणि समाज यात आंतरिक सुसंवाद असतो. त्यामुळे केवळ उच्चार धाटणी वरूनच बोलणारा मध्यमवर्गीय आहे की, कनिष्ठ वर्गीय, व्यापारी आहे की अधिकारी, कोकणातला आहे की, खानदेशातला आहे, हे ओळखायला येतं.
हेल काढून बोलणारा, ळ ऐवजी य किंवा ड, कमळ (कमय), बाळ (बाय) उच्चारण करणारा,चहा पिऊन टाकला, सामान घेऊन घेतले, अशी द्विक्रियापदे वापरणारा माणूस खानदेशी आहे, हे चटकन ओळखता येतं. याउलट अनुनासिक उच्चारण करणारी व्यक्ती कोकणातली आहे, असं खुशाल समजावं.