ठाणे महानगरपालिका  Pudhari News Network
ठाणे

TMC News | ठाणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करा अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जा !

मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांचा सूचक इशारा

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी (ठाणे) : गेल्या तीन दिवसापासून ठाणे महापालिकेच्या डायघर कचरा प्रकल्पातील कचऱ्याच्या डोंगराला आग लागली आहे.अद्याप या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलेलं नाही. डायघर गावासह आजूबाजूच्या गावात धूर पसरला असून नागरिकांना यांचा त्रास होऊ लागला आहे. मात्र सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने व लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने अखेर मनसेनें आवाज उठवला आहे.

मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स पोस्ट करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ठाणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल,असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात डायघर डम्पिंग विषय पेट घेण्याची चिन्ह दिसून येत आहेत. जनतेसाठी उपलब्ध असणारे आमदार राजेश मोरे यांनी देखील डायघर परिसराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता मनसेने स्थानिकांच्या अडचणी समस्या कणखर शब्दात प्रशासन व मंत्र्यांकडे पोहचवल्या आहेत.

काय म्हणाले राजू पाटील एक्स पोस्ट मध्ये....

ठाण्यात साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण आली तर त्या दुकानदारांचे अतिक्रमण लगेच तोडले ….मग आता डायघर परिसरातील नागरिकांचे दु:ख यांना दिसत नाही का ?

ठाण्याच्या कचऱ्यापासून डायघर मध्ये वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरु केला होता. हा प्रकल्प सुरु होण्याआधीच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं कि तुमचा हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. या प्रकल्पाला सुरु करण्यासाठी आवश्यक ते नियम इथे पाळले जात नव्हते. शेवटी कचऱ्यापासून वीज निर्मिती नव्हे तर ह्यांनी दुर्गंधीची निर्मिती केली व आता तर भयंकर वायुप्रदुषण पण होत आहे.या संदर्भात सातत्याने ग्रामस्थांसोबत संघर्ष केला आणि ठाण्याचा कचरा डायघरमध्ये बंद केला. पण आता आपलीच मक्तेदारी समजून यांनी नागरिकांना गृहीत धरायला घेतलं आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते नागरिकांच्या घरांमध्ये धूर गेलाय. मुख्यमंत्री पद भूषविल्या नंतरही हा ठाण्याच्या कचऱ्याचा प्रश्न हे बापबेटे सोडवू शकले नाहीत ही अत्यंत लिजीरवाणी गोष्ट आहे…अर्थात कचऱ्यात पण भ्रष्टाचार करून पैसा खाणाऱ्यांना थोडीतरी लाज-शरम उरली असेल तर ! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ठाणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल. अस मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

तीन दिवसांपासून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत असताना शुक्रवारी पुन्हा आगीचा पहाटे भडका उडाला आहे. याचा अचानक आग वाढल्याने परिसरात प्रचंड धूर पसरला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना लोकप्रतिनिधी,अधिकारी कानाडोळा करत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT