

नेवाळी (ठाणे) : ठाणे महापालिकेच्या डायगर डम्पिंग ग्राउंड ला भीषण आग लागली आहे. बुधवारी (दि.5) लागलेली आग गुरुवारपर्यंत (दि.6) नियंत्रणात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली होती. मात्र शुक्रवारी (दि.7) पहाटे पुन्हा एकदा या आगीचा भडका उडाला असल्याचे चित्र समोर आले आहे. या महाभयंकर आगीच्या धुरानं नागरिकांना घराबाहेर पडण देखील कठीण झाले असल्याचे नागरिकांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले आहे.
ठाण्याच्या कचऱ्याने डायघर ग्रामस्थ व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रकल्पात निर्माण केलेल्या कचऱ्याच्या डोंगरामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले होते. मात्र आता या कचऱ्याच्या डोंगराने तीन दिवसांपासून पेट घेतल्याने डायघर गाव व आजूबाजूच्या नागरी वस्तीला या दूषित हवेचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष बाब म्हणजे तीन दिवसांपासून डंपिंग ग्राउंड वरील आगीने ग्रामस्थ त्रस्त झाले असताना महापालिकेचे कोणतेही सक्षम अधिकारी व लोकप्रतिनिधी हे या डंपिंग परिसरात फिरकले देखील नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या शिळफाटा अग्निशमन दलाच्या जवानांना कडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नसल्याचे स्थानिकांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले आहे.
ठाण्याच्या कचऱ्याचे प्लास्टिकचे खच मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंड वर आहे. त्यामुळे आधी वर नियंत्रण मिळवत असताना पुन्हा एकदा आग भडकत असल्याने आग नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आहे. प्रकल्पातील कचऱ्याच्या डोंगरावर प्लास्टिक अधिक प्रमाणात असल्याने आगीमुळे प्रचंड धूर निर्माण झालं आहे. मानवी वस्ती जवळ असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.