ठाणे : येत्या पाच वर्षात ठाणे स्वयंपूर्ण करण्यासाठी ठाण्यात गुंतवणूक वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेने केले आहे . यासाठी शहरात आय टी सेंटर आणि डेटा सेंटर आणून या माध्यमातून ही रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणार्या ठाणेकरांना भविष्यात मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय यावर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिकांच्या हॅपिनेस इंडेक्सवरही विशेष भर देण्यात आला असून ठाणेकरांना ठाण्यात राहावेसे वाटले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आपला ठाणे महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक म्हणून पहिला अर्थसंकल्प सादर केला असून आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातून हा अर्थसंकल्प खर्या अर्थाने विशेष ठरला आहे. एमएमआर क्षेत्राचा विचार केल्यास ठाणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये कनेक्टिव्हीटी असून संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये ठाणे हे एक महत्वाचे शहर झाले आहे. ठाण्याच्या वाढीसाठी शहरात गुंतवणुक येणे अतिशय महत्वाचे आहे. ही गुंतवणूक वाढवायची असेल तर ठाण्यात आय टी सेंटर आणि डेटा सेंटर येणे आवश्यक असून आता त्या दृष्टीने ठाणे महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात महत्वाची पाऊले उचलली असल्याचे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
ठाण्यातून मुंबईला दररोज हजारोंच्या संख्येने ठाणेकर नोकरी आणि रोजगारासाठी जात असतात. याच रोजगाराच्या संधी ठाण्यात निर्माण करण्यासाठी ठाण्यात अशाप्रकारची आय टी सेंटर आणि डेटा सेंटर येण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पाच वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. पाच वर्षात ठाण्यात ही सेंटर्स आली तर ठाण्यातच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून यासाठी ठाणेकरांना रोजगारासाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्प सादर करतांना यापूर्वी शासनाकडून ज्या ज्या विकासकामांसाठी निधी मंजुर झाला आहे, किंवा मिळाला त्या कामांचा अर्थात कळवा हॉस्पीटल, गडकरी रंगायतन, तलाव संवर्धन आणि सुशोभिकरण, हरित ठाणे उपक्रम, एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प आदींसह इतर प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नव्याने महापालिकेच्या माध्यमातून कोलशेत येथे अॅम्युजेमंट पार्क, स्रो पार्क प्रकल्प, दादोजी कोंडदेव स्टेडीअम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब, एमआरटीएस ने आरक्षित भुखंडावर इनडोअर स्पोर्ट्स क्लब व वाचनालय, ठाणे टाऊन पार्क, व्हिवींग टॉवर अॅण्ड कन्व्हेंशन सेंटर आदी प्रकल्प हे पीपीपीच्या माध्यमातून करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
मालमत्ता कर वसुली समाधानकारक असली तरी,पाणीपट्टी वसुली समाधानकारक नसल्याने या दोन्ही सेवांचे एकच बिल काढण्याचा पालिका स्तरावर विचार सुरु आहे. यासाठी सेवा दोन्ही सेवा संलग्न करण्याचा पालिकेचा विचार सुरु असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
वाहतुक कोंडी मुक्त ठाणे करण्यावर आगामी काळात भर दिला जाणार असून, त्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाजया ठाणे घोडबंदर रस्त्यांचे दोन्ही बाजूच्या सर्व्हीस रस्त्यांचे मुख्य रस्त्यामध्ये समावेश, घाटकोपर ते ठाणे दरम्यान इर्स्टन फ्री वेचा विस्तार, आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे, अंतर्गत मेट्रो, मुख्य मेट्रो, ठाणे बोरीवली टनेल, कोस्टल रोड आदींच्या कामांमुळे येत्या काळात ठाणे वाहतुक कोंडी मुक्त होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तसेच येत्या पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते देण्यावर भर देण्यात येणार आहे.
मागील वर्षी ठाणे महापालिकेने अनुदानापोटी 284 कोटी अपेक्षित धरले होते. परंतु प्रत्यक्षात पालिकेला 914 कोटी अनुदानापोटी मिळाल्याने आता पुन्हा 2025-26 मध्ये 612 कोटी 59 लाख इतके अनुदान अपेक्षित धरले आहे. यात पायाभुत सुविधांसाठी 300 कोटी, कळवा रुग्णालय 3 कोटी, एकात्मिक स्मशानभुमी नुतनीकरण 10 कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम 12 कोटी 19 लाख, 15 वा वित्त आयोगा 26 कोटी, एमएमआरडीएकडून 1 कोटी, नागरी सेवा सुविधांसाठी 25 कोटी, अमुत योजना 2 साठी 48 कोटी 52 लाख, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत तलावांचे संवर्धन 5 कोटी 62 लाख अपेक्षित धरण्यात आले आहेत.
मालमत्ता कर व फी पासून सन 2024-25 मध्ये रु. 819 कोटी 71 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. डिसेंबर 2024 अखेरचे उत्पन्न 512 कोटी 42 लक्ष विचारात घेवून मालमत्ता करापासून 776 कोटी 42 लक्ष सुधारित अंदाज करण्यात येत आहे.
मालमत्ता करासाठी संपूर्ण शहराचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामधून महापालिकेच्या महसुलामध्ये वाढ अपेक्षित आहे.
सन 2024-25 मध्ये शहर विकास विभागाकडून विकास व तत्सम शुल्कापोटी 750 कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. शहर विकास विभागाकडून प्राप्त झालेले डिसेंबर 2024 अखेरचे उत्पन्न रक्कम 385कोटी 9 लक्ष विचारात घेऊन शहर विकास विभागाकडील उत्पन्न रक्कम 582 कोटी 15लक्ष सुधारित करण्यात आले आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात 650 कोटी 80 लक्ष इतके उत्पन्न अपेक्षित करण्यात आलेले आहे.
स्थानिक संस्था कर विभागाचे सुधारित अंदाज एकूण 1353 कोटी 43 लक्ष अपेक्षित केले आहेत. तसेच सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी वस्तू व सेवाकर अनुदानापोटी 1233 कोटी 79 लक्ष , मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान 200 कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली 8 कोटी असे एकूण 1441 कोटी 79 लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे.
पाणी पुरवठा आकारासाठी सन 2024-25 मध्ये रु. 225 कोटी उत्पन्न अपेक्षित होते. यामध्ये मोठया प्रमाणात घट दिसून येत आहे. पाणी पुरवठा आकाराचे सुधारित अंदाज रु. 200 कोटी अपेक्षित केले असून सन 2025-26 मध्ये रु.250 कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.
सन 2024-25 या आर्थिक वर्षात स्थावर मालमत्ता विभागाकडून 12 कोटी 50 लक्ष अपेक्षित केले होते ते सुधारित अंदाज 20 कोटी 32 लक्ष अपेक्षित केले आहे. सन 2025-26 मध्ये स्थावर मालमत्ता विभागाकडून 15 कोटी 41 लक्ष उत्पन्न अपेक्षित करण्यात आले आहे.
जाहिरात फी पोटी सन 2024-25 मध्ये 24 कोटी 62 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले होते. डिसेंबर 2024 अखेर प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्न 9 कोटी 53 लक्ष झाले असल्याने सुधारित अंदाजपत्रकात जाहिरात फी पासून 12 कोटी 30 लक्ष उत्पन्न अपेक्षित केले असून सन 2025-26 मध्ये 22 कोटी उत्पन्न अंदाजित केले आहे.
सन 2024-25 मध्ये शासनाकडून डिसेंबर 2024 अखेर 914 कोटी 35 लक्ष अनुदान प्राप्त झाले. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रु.612 कोटी 59 लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभुत सुविधांतर्गत 300 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नुतनीकरण व सुधारणा 5 कोटी, एकात्मिक स्मशानभुमी नुतनीकरण 10 कोटी, सार्वजनिक शौचालय बांधकाम व नुतनीकरण रु. 12 कोटी 19 लक्ष, पंधरावा वित्त आयोग रु.26 कोटी, एमएमआरडी कडून मुंबई नागरी पायाभूत सुविधांतर्गत 1 कोटी, महानगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेंतर्गत 25 कोटी, अमृत योजना फेज 2 साठी 48 कोटी 52 लक्ष, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील 6 तलावांचे संवर्धनासाठी 5 कोटी 62 लक्ष अनुदानांचा समावेश आहे.