

ठाणे : सौरभ राव यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि प्रशासक म्हणून यांनी आपला पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. 2024-25 चे 5025 कोटी 1 लाखांचा मुळ अर्थसंकल्प सुधारीत करून आरंभीच्या शिल्लकेसह 6550 कोटी व 2025-26 च्या आरंभीच्या शिल्लकेसह 5645 कोटीचा अर्थसंकल्प सादर सौरभ राव यांनी सादर केला.
पालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने अपेक्षेप्रमाणेच कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ न करता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 2025- 26 चा 66 लाख शिलकीसह 5645 कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महापालिकेवर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी नव्याने हाती घेण्यात येणारे प्रकल्प ही खासगी लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प हा काटकसरीचा अर्थसंकल्प आहे. अनुदानापोटी 284 कोटी अपेक्षित धरण्यात आले असतांना 914 कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात 620 कोटींची वाढ दिसून आली आहे. भांडवली खर्चापेक्षा महसूल खर्च अधिक असून महसुली खर्च हा 3722 कोटी 93 लाख तर भांडवली खर्च हा 1921 कोटी 41 लाख असल्याचे यावर्षीच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.
सन 2024-25 मध्ये रु. 5025 कोटी 1 लक्ष रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा आकार, करवसुली, जाहिरात, व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न 3454 कोटी 83 लक्ष ऐवजी 3220 कोटी 42 लक्ष सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणार्या अनुदानाचा विचार करता, मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या रु. 284 कोटी 32 लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2024 अखेर 914 कोटी 35 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी 1162 कोटी 71 लक्ष अपेक्षित केले आहे व अमृत 2.00 योजनेसाठी 20 कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते; परंतु मार्च 2025 अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही.
खर्च बाजूस सन 2024-25 मध्ये महसुली खर्च रु. 3345 कोटी 66 लक्ष प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात रु.3034 कोटी 77 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च रु.1679 कोटी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च 2067 कोटी 50 लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महुसली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, पोषक व शाश्वत पर्यावरणाकरीता उपाययोजना, गतिमान वाहतुकीसाठी पायाभुत सुविधांची कामे, महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला जेष्ठ नागरीक, दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर भर, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा, यासाठी लक्ष, वृक्षगणना व वृक्षसंवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट ठरली आहेत.
ठाणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच कामाचा वेग वाढावा यासाठी यापुढे पालिकेचा कारभार हा ई प्रणालीच्या माध्यमातून चालणार असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे महापालिकेत आता कागदी घोडे नाचवण्याच्या ऐवजी सर्व फाईल आणि महत्वाचे प्रस्ताव आता यापुढे ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच ठाणे महापालिकेच्या कारभारात ई-ऑफिस प्रणालीवर भर देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेल्या 2025 - 26 च्या अर्थसंकल्पात याचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे सर्व पत्रव्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने केले जाणार आहेत. त्यातून ठाणे महापालिकेच्या अधिकार्यांमध्ये समन्वय साधला जाऊन पेपर गहाळ होण्याच्या तक्रारी देखील कमी होणार आहेत. याशिवाय मंत्रालयात देखील या पध्दतीच्या माध्यमातून पाठपुरावा करणे सोईचे होणार आहे. येत्या वर्षभरात महापालिकेचा कारभार हा 100 टक्के ई ऑफिस प्रणालीवर होणार असल्याचे आयुक्त सौरभ राव म्हणाले.
कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प
महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
खर्चामध्ये वित्तीय शिस्त
पोषक व शाश्वत पर्यावरणाकरिता उपाययोजना
गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामे
महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण
महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर
प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर
कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष
वृक्षगणना व वृक्षसंवर्धन
600 ते 800 ढझऊ क्षमतेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प
सोलोराईज्ड मेकॅनिकल कम्पोस्टिंगद्वारे ओल्या घनकचर्यापासून खतनिर्मिती प्रकल्प
ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प
शुन्य कचरा मोहीम-संपूर्णत: नवीन कचरा संकलन यंत्रणा
सार्वजनिक रस्ते साफसफाई
पद्मश्री सिंधुताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र
मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल
कौसा हॉस्पिटल कार्यान्वित
स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतिगृहाचे नूतनीकरण
मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानअंतर्गत आत्तापर्यंत 1,24,144 वृक्षांची लागवड
ठाण्यात 4845 सोडियम व्हेपर दिव्यांच्या जागी एलईडी दिवे
आदिवासी भागात 400 नवीन सोलार पथदिप लावण्यात आले.
रहेजा संकुलासमोरील ध्यानधारणा केंद्र व हँगिंग गार्डन
धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव बाळकुम कार्यान्वित
स्व. बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर
कल्पतरु जलकुंभ, दोस्ती बाळकुम जलकुंभ, पिरामल जलकुंभ, बेथनी जलकुंभांची कामे पूर्ण
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी
उपवन तलाव येथे म्युझिकल फाऊंटन उभारण्यात आलेले आहे.