Murder Case Pudhari
ठाणे

Titwala Ola Driver Murder: टिटवाळ्यातील बेपत्ता ओला चालकाचा मृतदेह माळशेज घाटात; आरोपी अटकेत

चार दिवसांच्या शोधानंतर उलगडा; कार जंगलात आढळली, हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या टिटवाळ्यातील ओला चालकाचा मृतदेह माळशेज घाट परिसरात आढळून आला. या घटनेने ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एका तरुण चालकाचा थरकाप उडवणारा खून, वेगवेगळ्या जिल्ह्यांत सापडलेले पुरावे आणि गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासामुळे उघडकीस आलेला आरोपी या सर्व घटनाक्रमाने संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण आले आहे. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत या प्रकरणाचा माग काढत टिटवाळ्यातील आरोपीला अटक केली आहे. मात्र या हत्येमागील खरे कारण अद्यापही गुलदस्त्यात राहिले आहे.

नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेला नासिर अहमद हा ओला कंपनीसाठी कार चालवून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र चार दिवसांपूर्वी अचानक त्याच्याशी संपर्क तुटल्याने कुटुंबीयांनी रबाळे पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असताना शनिवारी एक धक्कादायक माहिती समोर आली. माळशेज घाट परिसरातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि तपासाअंती तो बेपत्ता असलेल्या नासिर अहमद याचाच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान,

या घटनेने वेगळेच वळण घेतले. नासिरची ओला कार कल्याण-मुरबाड मार्गावरील गोविली गावाच्या जंगल परिसरात आढळून आली. कारच्या आत मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा तपास गतीमान केला. ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांचा बारकाईने मागोवा घेत तपासाची दिशा निश्चित केली. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने आदर्श भालेराव या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, ओला चालक नासिर अहमद याची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा उलगडा अद्याप झालेला नसून या हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती डीवायएसपी अनिल लाड यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT