टिटवाळा: टिटवाळा महागणपती मंदिर परिसरातील मुख्य रस्त्याचे रखडलेले काम सध्या भाविक आणि स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, अर्धवट अवस्थेत सोडलेल्या रस्त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता खोदून ठेवण्यात आला असला तरी अनेक दिवस उलटूनही काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या उखडलेल्या आणि असमतल रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून, अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
टिटवाळा महागणपती मंदिर हे राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असून, येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरातील हा रस्ता स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच गोवेली रोड, मुरबाड रोड आणि नाशिक रोडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
मात्र रस्त्याच्या मधोमध उघडे पडलेले खड्डे, विस्कटलेले ब्लॉक आणि अर्धवट कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार केडीएमसी प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. सोशल मीडियावरही या प्रश्नावर आवाज उठवण्यात आला. तरीदेखील प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावरील असमतल भाग स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनत आहे.
दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असताना नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास रस्त्याची खरी परिस्थिती दिसणार नाही आणि त्यामुळे मोठे अपघात घडू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करून रस्ता सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी जनआंदोलनाचा इशारा
या संदर्भात स्थानिक नगरसेवक संतोष तरे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. काम करणाऱ्या आधीच्या ठेकेदाराचा अचानक मृत्यू झाल्यामुळे काही काळ हे काम थांबले होते. मात्र आता नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच काम पुन्हा सुरू होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
जनताहित फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक रितेश कांबळे यांनीही प्रशासनाला इशारा देत नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करू नये, अशी मागणी केली आहे. ‘रस्त्याचे पूर्ण काम होईपर्यंत धोकादायक भाग तात्पुरत्या स्वरूपात समतल करून सुरक्षित करण्यात यावा. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी जनआंदोलन उभारले जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला.