टिटवाळा : माघी गणेशोत्सव 22 जानेवारीपासून सर्वत्र साजरा होत असून टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने माघी श्री गणेशोत्सवाला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. सोमवारपासून या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. माघ शुद्ध प्रतिपदेनिमित्त झालेल्या ज्योतपूजन, भजन, गायन आणि रात्रीच्या कीर्तनाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भाविकांची दिवसभर लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी माघ शुद्ध द्वितीयेनिमित्त उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत पुन्हा भजन, तर संध्याकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत नृत्य कार्यक्रम तसेच रात्री 8.30 ते 11.00 या वेळेत ह.भ.प. श्री गणेश गोविंद गाडगीळ (कल्याण) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले.
तर बुधवार, 21 जानेवारी रोजी माघ शुद्ध तृतीयेच्या दिवशी सकाळी व दुपारी भजन, संध्याकाळी गायन आणि रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, 22 जानेवारी रोजी माघ शुद्ध चतुर्थी अर्थात श्री गणेश जन्मोत्सव साजरा होणार असून, सकाळी विशेष कीर्तन, दुपारी श्री गणेश जन्मोत्सव व महाआरती, दुपारी भजन आणि संध्याकाळी 8 वाजता ‘श्री’चा पालखी सोहळा भक्तिभावात पार पडणार आहे.
शुक्रवार, 23 जानेवारी रोजी माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी सकाळी व दुपारी भजन, संध्याकाळी नृत्यांगना अश्विनी केवटकर-जोशी यांचा नृत्याविष्कार आणि रात्री 8.30 ते 11.00 या वेळेत लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव काळात दररोज रात्री 9.00 वाजता श्रींची आरती होत असून, टिटवाळा व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन माघी श्री गणेशोत्सवाचा आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.