टिटवाळ्यातील ‌‘धोक्याची कडी‌’ अखेर हटली pudhari photo
ठाणे

Thane News : टिटवाळ्यातील ‌‘धोक्याची कडी‌’ अखेर हटली

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या तत्पर हस्तक्षेपाने संभाव्य अपघात टळला

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : टिटवाळा शहराच्या गजबजलेल्या गणेश मंदिर रोडवर काही दिवसांपासून उभा असलेला अर्धवट तुटलेला लोखंडी रेलिंग डिव्हायडर अखेर हटवण्यात आला असून संभाव्य जीवितहानीचा मोठा धोका टळला आहे. रस्त्याच्या मधोमध सिमेंटचा पाया उखडलेला आणि त्यातून बाहेर आलेले धारदार लोखंडी सळईसदृश रेलिंग रात्रीच्या अंधारात वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत होते. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचारी यांच्यासाठी हा भाग अत्यंत घातक बनला होता. स्थानिक नागरिकांकडून वारंवार सूचना दिल्या जात असतानाही आवश्यक दुरुस्ती होत नसल्याने असंतोष वाढत होता.

प्रसारमाध्यमांतून या धोकादायक परिस्थितीवर प्रकाशझोत पडताच कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. कोणतीही प्रशासकीय दिरंगाई न करता त्यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ते अर्धवट तुटलेले रेलिंग तत्काळ हटवण्याची कार्यवाही केली. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत धोकादायक लोखंडी संरचना बाजूला करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. संभाव्य अपघाताची शक्यता ओळखून वेळ न दवडता घेतलेला हा निर्णय शहराच्या सुरक्षेसाठी मोलाचा ठरला आहे.

मुळात अशा प्रकारच्या रस्त्यावरील डिव्हायडरची देखभाल व दुरुस्ती ही पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते; मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ‌‘कर्तव्याप्रती निष्ठा आणि समाजभान यांची सांगड घालणारे अधिकारी प्रत्येक खात्यात असतील, तर प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक बळकट होईल,‌’ असे मत ॲड. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.

टिटवाळ्यातील ही घटना केवळ एक लोखंडी रेलिंग हटवण्याची नाही, तर जबाबदारीची जाणीव आणि तातडीच्या कृतीचे उदाहरण आहे. शहर झपाट्याने वाढत असताना पायाभूत सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. त्यामुळे संबंधित विभागांनी नियमित पाहणी व वेळेवर दुरुस्ती यावर भर देणे गरजेचे आहे. एका सजग अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे टळलेला हा संभाव्य अनर्थ प्रशासनासाठीही आत्मपरीक्षणाचा विषय ठरावा, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT