Pudhari Impact Pudhari
ठाणे

Pudhari Impact: टिटवाळ्यातील ‘व्हाईट कॉलर’ अतिक्रमणावर कारवाईचा बडगा; दै.पुढारीच्या वृत्ताची महापौरांकडून दखल

मांडा-टिटवाळा पश्चिमेतील वासुंदरी रोडवरील प्रकार; पुढारीच्या वृत्तानंतर महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांनी घेतली दखल.

पुढारी वृत्तसेवा

अजय शेलार

टिटवाळा: सर्वसामान्य फेरीवाल्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाईचा बडगा उगारला जात असताना प्रतिष्ठित व्यावसायिकांकडून सार्वजनिक फुटपाथवर अतिक्रमण केले जात असल्याचा मुद्दा पुढारी वृत्तपत्राने उपस्थित केला होता.

मांडा-टिटवाळा पश्चिमेतील वासुंदरी रोडवरील एका डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेर लोखंडी जाळीचे ब्रॅकेट्स उभारून फुटपाथची जागा अडविण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांनी या प्रकरणाची दखल घेतली.

त्यांच्या पुढाकाराने अखेर अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त राठोड यांच्या उपस्थितीत आज सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई करत फुटपाथवरील लोखंडी जाळीचे ब्रॅकेट्स हटविले.

तसेच फुटपाथ बेकायदेशीरपणे अडवून टपऱ्या टाकलेल्या इतर अनेक टपरीधारकांवर देखील कारवाई केली. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी अडविण्यात आलेला मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक नागरिकांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे, कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते भवानी चौक (प्रेम ऑटो) परिसरात सोमवारी महापालिकेकडून स्वच्छता आणि अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांनी फुटपाथ हे नागरिकांच्या चालण्यासाठी आहेत, अतिक्रमणासाठी नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती.

सार्वजनिक रस्ते आणि परिसर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर टिटवाळ्यातील डॉक्टरांच्या क्लिनिकबाहेरील अतिक्रमणाचा मुद्दा पुढारीने उपस्थित केला होता.

कल्याणमधील कारवाईनंतर टिटवाळ्यातील या प्रकाराबाबत महापौरांकडे विचारणा करण्यात आली असता, संबंधित प्रकाराची माहिती घेऊन बोलते, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज प्रत्यक्ष महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी धडक देत लोखंडी जाळीचे ब्रॅकेट्स हटविण्याची कारवाई केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT