खडवली : मनोज ताठे
टिटवाळा मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी १५ डब्यांच्या लोकलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकात १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्तारीकरणासह आवश्यक तांत्रिक कामे हाती घेण्यात आली होती. या कामासाठी प्रवाशांना काही काळ रेल्वे वाहतुकीतील गैरसोयींचाही सामना करावा लागला. मात्र येथील लोकल प्रवाशांना आता प्रतीक्षा आहे ती १५ डब्यांच्या लोकलची.
दिवाळीनंतर या मार्गावर १८ अतिरिक्त १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. पंधरा डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशाचे होणारे हाल कमी होणार आहेत. दरम्यान फलाट विस्तारीकरण झाल्यानंतर रेल्वे १५ डब्यांच्या सुरू करून प्रवाशांना लवकरात लवकर दिलासा देणे गरजेचे असतानाही, आता प्रवाशांना १५ डब्यांच्या लोकलची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.
२२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, टिटवाळा स्थानकातील फलाट विस्तारीकरणाचे काम १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. तसेच कल्याण–कसारा मार्गावर १८ अतिरिक्त १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले होते. मात्र अद्याप त्याची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.
या निर्णयामुळे टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा परिसरातील प्रवाशांना गर्दीच्या समस्येतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कामानिमित्त मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नोकरदार व विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरू शकते. मात्र, नियोजित मुदत जवळ आल्यानंतर फलाट विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे का? अतिरिक्त १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या कधी सुरू होणार? त्यांचे वेळापत्रक काय असणार? असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने टिटवाळा स्थानकातील कामाची सद्यस्थिती स्पष्ट करावी व १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याबाबत अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पंधरा डब्यांच्या लोकलची प्रतीक्षाच
फलाट विस्तारीकरणानंतर पंधरा डब्यांच्या लोकलची प्रवाशांना प्रतीक्षा लागली असून केव्हा सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. टिटवाळा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक वाढवणे, ट्रॅकची कामे, सिग्नल यंत्रणेत बदल आणि ओव्हरहेड इक्विपमेंटचे काम हाती घेण्यात आले होते. या विस्तारीकरणामुळे कल्याण-कसारा मार्गावर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी १८ नवीन १५ डब्यांच्या लोकल सेवा जोडण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. १५ डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांची क्षमता २५% पर्यंत वाढणार असून गर्दीचा ताण कमी होणार आहे.