Thane Rain
डोंबिवली : कल्याण तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे उल्हास नदीची पातळी अचानक वाढल्याने मोहिली गावाजवळ उल्हास नदीत तीन गुराखी अडकले होते. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोठ्या धाडसाने या तिघांची सुटका केली. देऊ मंगल गायकर (वय ६०), शंकर घटल्या पाटील (वय ५५) आणि सावळाराम गोप्या वाघे (वय ६५) अशी या तिघांची नावे आहेत.
ग्रामीण भागातील मोहिली गावाजवळ पावसामुळे उल्हास नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. देऊ गायकर, शंकर पाटील,वळाराम गोप्या वाघे हे तिघे गुराखी सोमवारी (दि.२६) सकाळी आपल्या दुभत्या म्हशी उल्हास नदी काठच्या माळरानावर चरायला घेऊन गेले होते. यादरम्यान नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने ते ज्या मार्गाने आले होते. तो मार्ग बंद झाला. म्हशी घरी घेऊन जाण्याचा रस्ता हा नदी काठाजवळून होता. नदीच्या पाण्याची पातळी वाढत जाऊन हे तिन्ही गुराखी एका माळरानावर अडकले. गुराख्यांच्या म्हशी पाणी पातळी वाढताच पाण्यात सूर मारून सुरक्षितपणे बाहेर आल्या. नदीची पाणी पातळी आणखी वाढू लागल्याने तिघांनी बचावासाठी आरडाओरडा केला. नदीने रौद्ररूप धारण केल्याने कुणीही नदी पात्रात उतरून बचावासाठी पुढे येत नव्हता. ही माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळताच त्यांनी महसूल आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाला तिन्ही गुराख्यांची पुरच्या पाण्यातून सुटका करण्याच्या सूचना दिल्या.
अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, मंडळ आणि ग्राम महसूल अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आप्तकालीन पथकाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. नदीत सराईतपणे बोट वल्हवणारे गाळेगावातील ग्रामस्थ गुरुनाथ पवार (४०), रोहन पवार (२१) यांना न्हावेसह पाचारण करण्यात आले. नदी पात्राची माहिती असल्याने अग्निशमन जवान यांच्या साथीने गुरूनाथ, रोहन यांनी पुराच्या पाण्यात बोट चालवून त्या तिघांपर्यत गुराख्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर गुराख्यांना नावेकऱ्यांनी बोटीत बसून नदीकाठच्या सुरक्षित ठिकाणी आणून उतरविले.