

ठाणे : ठाण्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. शुक्रवार(दि.१९), शनिवारी (दि.२०), रविवार (दि.२१) सतत 3 दिवस ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू असून रविवारी (दि.२१) दुपारी 3 वाजेपर्यंत 41.41 मी.मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, 1 जून पासून आतापर्यंत 1635.29 मिमी इतका पाऊस पडला आहे. पावसाने पडझडीसह बारा बंगला तसेच अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. रविवारी (दि.२१) रोजी सकाळी 9.30 ते 10.30 या एका तासात तब्बल 15.75 मिमी इतका पाऊस पडला आहे.
ठाण्यात शनिवार (दि.२०) रोजी पासूनच पावसाने कहर करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी मोठे झाड पडण्याची घटना समोर आली. तर रविवार सकाळपासून पावसाची रीपरीप सुरूच असल्याने 6 ठिकाणी झाडे कोसळण्याची तर पाच ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याची घटना शहरात घडली आहे. तर एक झाड धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागातील कर्मचाऱ्यांंनी दिली आहे.
पावसाची संततधार सुरू असताना कोपरी विसर्जन घाट खाडी परिसरात फिरण्यास गेलेल्या 35 वर्षीय चेतन प्रजापती याने खाडीच्या पाण्यात स्वतःला झोकून दिले. घटनास्थळी कोपरी पोलीस, अग्निशमन दल, आपती व्यवस्थापन पथक खाडीत बुडालेल्या चेतनचा शोध घेत आहेत. चेतन हा महापालिकेचा कर्मचारी असल्याचे समजते. त्याने आत्महत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला असून अद्याप त्या इसमाचा शोध सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी यांनी दिली.
भिवंडी शहरातील कामालतघर येथील गावदेवी वर्हाळा माता मंदिराच्या सानिध्यातील वर्हाळा तलाव मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात ओव्हरफ्लो झाला आहे. एकूण 62 किलोमीटर परीक्षेत्र असलेल्या वर्हाळा तलावातून जुन्या भिवंडी शहरात दररोज पाच एम एल टी पाणीपुरवठा केला जात आहे. रात्रीपासूनच वर्हाळा तलावातील पाणी कामतघर रस्त्यालगत असलेल्या सांडव्यातून वाहत आहे. त्याठिकाणी विलोभनीय असे दृश्य दिसत आहे.
विरार पूर्व आर जे नाका ते गुरुदत्तनगर या मुख्य रस्त्यावर रविवारी (दि.२१) रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारस झाड कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून झाडाखाली पार्क असलेल्या एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे. झाड कोसळून रस्ता मात्र बंद झाला आहे. वसई -विरार महापालिका अग्निशामक विभागाने रस्त्यात पडलेलं झाड लवकरात लवकर बाजूला करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.