Pudhari Photo
ठाणे

Pahalgam Terror Attack | पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्र्यातील हजारो लोक रस्त्यावर, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे

हल्ल्यास केंद्र सरकारही जबाबदार : डॉ.जितेंद्र आव्हाड

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच सय्यद अली यांच्या उपस्थितीत आज मुंब्रा परिसरात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. काळे झेंडे दाखवित, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हजारो मुंब्रावासियांनी रस्त्यावर उतरून दहशतवादी कृत्याचा निषेध केला.

काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान आणि शानु पठाण यांच्या आवाहनानुसार हजारो मुंब्रावासियांनी रस्त्यावर उतरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जुम्माचा नमाज अदा केल्यानंतर हजारो लोक सुरूवातीला कौसा जामा मशिदीबाहेर जमा झाले. तिथे निदर्शने केल्यानंतर रिझवी बाग मस्जिद, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय, तनवीर नगर येथे आंदोलन केले. या प्रसंगी शमीम खान यांनी रास्ता रोकोदेखील केला. तसेच, रशीद कंपाउंड येथेही नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी, पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद को जड से मिटाओ, हमारी जान हिंदुस्थान अशा घोषणा दिल्या.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी, पहलगाम येथील हत्याकांडास जेवढे दहशतवादी जबाबदार आहेत. तेवढेच जबाबदार केंद्र सरकारही आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था डळमळीत का होती? येथील लष्कराचे जवान कुठे होते?, असा सवाल केला. डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्ययात्रा पाहून देशातील प्रत्येक घरात अश्रू दाटले. त्यामुळेच मुंब्रा-कौसातील बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर प्रत्येक नाक्यावर पाकिस्तानचा निषेध करणारे आंदोलन केले. हे आंदोलन माणुसकीचे प्रतिक आहे. 26 जणांच्या मृत्यूला जसे दहशतवादी जबाबदार आहेत. तसेच हे सरकारही जबाबदार आहेत या परिसरात एकही सुरक्षा रक्षक नव्हता; याचाच अर्थ खुल्या मैदानात निष्पाप नागरिकांना मरण्यासाठी सोडले होते का? पाकिस्तानचा धोका असूनही लष्कराचे जवान तैनात करण्यात आले नाहीत, याचाच अर्थ सरकारचे लक्ष नाही. सैनिकांची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. म्हणजेच सैन्य भरती झालेली नाही. जणू काही भारताने चीन, पाकिस्तानशी शांतीकरारच केला आहे. पण, प्रश्न विचारायचे नाहीत, असेच धोरण या सरकारचे आहे. आता यंत्रणेत त्रुटी होत्या, अशी कबुली दिली जात आहे. त्याचा काय फायदा? दहशतवाद्यांसाठी दरवाजे उघडे ठेवले ना? त्यामुळे चुकीला माफी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT