श्री मलंगगड पट्ट्यात आता तिसऱ्या बिबट्याच्या पाऊलखुणा  File Photo
ठाणे

श्री मलंगगड पट्ट्यात आता तिसऱ्या बिबट्याच्या पाऊलखुणा

पाली गावात बिबट्याचे स्पष्ट दर्शन; बदलापूर वनविभागाकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील पाली गावाच्या हद्दीत शुक्रवारी तिसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी भातपिकाची कापणी करत असताना अचानक जवळच्या बांधावर बिबट्या दिसताच त्यांनी घरचा रस्ता पकडून सुटकेचा निश्वास टाकला आहे. या घटनेनंतर गावात सतर्कता वाढवण्यात आली असून नागरिकांना अनावश्यकपणे शेतमळ्यात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

कल्याण पूर्वेतील श्री मलंगडाच्या पायथ्याशी नुकताच दोन बिबट्यांचा दर्शन झाला होता. ते दोन्ही बिबटे रायगड जिल्ह्यातील नितलास गावाच्या हद्दीत होते. त्यानंतर आता खोणी तळोजा महामार्गावरील पाली गावाच्या हद्दीत एका बिबट्याचे दर्शन झाले आहे. आसपासचा परिसर सह्याद्री पर्वतरांगेला जोडलेला आहे. गेल्या काही वर्षांत या भागात वेगाने औद्योगिकीकरण, गृहसंकुल प्रकल्प आणि रस्त्यांचे जाळे वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक जंगलक्षेत्र झपाट्याने कमी होत असून वन्यजीवांचा अधिवास बाधित होत आहे. परिणामी बिबट्यासह इतर अनेक प्राणी अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागल्याचे वनतज्ज्ञांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणेरायगड जिल्ह्याच्या सीमेवरील नितलास गावाजवळ देखील बिबट्याचे दर्शन झाले होते. या दोन घटनांमुळे संपूर्ण परिसरात वन्यजीवांची हालचाल वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार संबंधित बिबट्या पाली गाव मार्गे पुढे डोंबिवलीच्या दिशेने हालचाल करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT