कल्याण ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या खासगी बसमधून प्रवास करताना चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या चोरीमध्ये अज्ञात चोरट्याने एका प्रवाशाचा 2 लाख 75 हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज बसमधून चोरीला गेला. प्रवासादरम्यान ही चोरी झाल्याने बसमधील कोणीतरी ही चोरी केली असण्याचा संशय तक्रारदाराला आहे. गुरूवार ते शुक्रवारच्या कालावधीत बस प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे. प्रवीणकुमार मनोहर थोरात (वय.43) असे तक्रारदाराचे नाव असून मूळचे ते कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त कल्याणमधील रामबाग भागात राहतात.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीणकुमार थोरात यांनी गुरूवारी (दि.29) रात्री नऊ वाजता खासगी बसने कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातून प्रवास सुरू केला. शुक्रवारी (दि.30) सकाळी 11 वाजता ते कोल्हापूरात उतरले. घरातून निघताना थोरात यांनी 2 लाख 72 हजारांचा ऐवज असलेली पिशवी एका मोठ्या बॅगमध्ये तळाला इतर कपड्यांमध्ये ठेवली होती. कोल्हापूर उतरून थोरात आपल्या घरी गेले. त्यावेळी पिशवीची चाचपणी केली असता, त्यांना पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. यानंतर बसमधील अज्ञात इसमानेच पाळत ठेऊन ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करून प्रवीणकुमार थोरात यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हवालदार जितेंद्र चौधरी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.