आईच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ मुलगा चार दिवस बसून  Pudhari File Photo
ठाणे

डोंबिवली : आईच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ मुलगा चार दिवस बसून

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 14 वर्षांचा मुलगा मागील चार दिवसांपासून आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. हे दोघेही माय-लेक फ्लॅटमध्ये राहत होते. त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असताना सोसायटीतील नागरिकांनी यांची माहिती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एल्विन डॅनिअल (वय.14) या मुलाने आजारी असलेल्या आई सिलिविया डॅनियल (वय.44) हिच्या मृतदेहासोबत चार दिवस काढल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहणाऱ्या 44 वर्षीय सिलिविया डॅनियल या आजारी महिलेचा घरातच चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मात्र या संदर्भात सोसायटीतील रहिवाशांना कोणतीही कल्पना नव्हती. सिलिविया सोबत राहणारा तिचा मुलगा एल्विन हा मानसिक रूग्ण आहे. त्यामुळे त्यालाही आपली आई सीलिविया हीचा मृत्यू झाल्याचे समजले नव्हते. आपली आई आजारी आहे, त्यामुळे ती अंथरुणात झोपली असावी, असे त्याला वाटले. परंतु झोपली नसून तिचा मृत्यू झालेला आहे हे त्याला कळालेच नाही. चार दिवसानंतर शेजाऱ्यांना डॅनियल यांच्या घरातून इमारतीत दुर्गंधी येत असल्याचे समजले.

बुधवारी (दि.31) रात्री सुरक्षा रक्षकासह सोसायटीतील काही रहिवासी दुर्गंधीबाबत विचारणा करण्यासाठी डॅनियल यांच्या फ्लॅटवर गेले असता मुलगा एल्विन याने दरवाजा उघडला. यानंतर समोरची परिस्थिती पाहून रहिवाशांनी तात्काळ खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली असता फ्लॅटमध्ये मुलगा एल्विनच्या आईचा कुजलेला मृतदेह आढळला.

एल्विनने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील मुलगा आणि आईपासून पुणे येथे वेगळे राहत आहेत. सिलिविया हीचा मृत्यू कोणत्यातरी आजाराने झाला आहे. यात कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सिलिविया यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला. मुलाच्या जबानीनंतर खडकपाडा पोलिसांनी सिलिवियाच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली. गुरूवारी दुपारी सिलिवियाच्या भावाने तिचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून आईच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ हा मुलगा राहिलाच कसा ? असा प्रश्न सोसायटीतील रहिवाशांसह पोलिसांनाही पडला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT