Thane Crime Pudhari
ठाणे

Thane Crime: ठाण्यात १९ वर्षीय तरुणाची हत्या

साहिल पांचाळ (वय १९, रा. डाेंगरीपाडा, ठाणे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: सोशल मीडियावर मैत्रिणीला मॅसेज केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या १९ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

या प्रकरणी चितळसर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. साहिल पांचाळ (वय १९, रा. डाेंगरीपाडा, ठाणे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत साहिल आणि चिन्मय डाेळस (१९, रा. दादलीनी, बाळकूम, ठाणे) हे दोघे डिलीव्हरी बाॅय एकमेकांच्या ओळखीतले आहेत. पूर्वी चिन्मयची एक मैत्रिण साहिलची देखील मैत्रीण झाली हाेती. यातूनच त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद हाेता. चिन्मयने मुलीच्या नावाने त्याच्या या मैत्रिणीशी सोशल मीडियावर संवाद सुरु ठेवला होता. हा प्रकार साहिलच्या लक्षात आला.

साहिलने चिन्मयला बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चितळसर भागातील डीएव्ही स्कूल जवळ बाेलवून घेतले. तिथेच चिन्मयचा माेठा भाऊ कुणाल डोळस व अन्य एक मित्र विवेक राजे (वय २०, रा. जवाहरनगर, ठाणे) हेही तेथे आले.

यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये कुणालने थेट साहिलच्या पाेटात चाकूने भोसकले. त्यानंतर चिन्मय आणि विवेक यांनीही त्याला जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेला साहिल याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी चितळसर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून कुणाल सुखदेव डोळस (रिक्षाचालक, राहणार दादलानी पार्कच्या मागे, बाळकुम, ठाणे), चिन्मय सुखदेव डोळस (वय १९ वर्षे, व्यवसाय - डिलिव्हरी बॉय, राहणार- बाळकुम, ठाणे पश्चिम) आणि विवेक दादा राजे (वय २० वर्ष, राहणार जवाहर नगर, आशर रेसिडेन्सी समोर, जवाहर नगर, ठाणे) यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT