डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन करून आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवून चोरी करणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला मानपाडा पोलिसांनी अटक केली. खार येथे राहणाऱ्या समृध्दी खडपकर (वय 29) आणि गोवा येथे राहणारे विलेंडर विल्फड डिकोस्टा, (वय 34) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीत राहणाऱ्या महेश पाटील यांची ओळख समृध्दी खडपकर यांच्यासोबत फेसबुकवरून झाली. त्यानंतर समृध्दी यांनी पाटील यांना खोणी गावातील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर पाटील यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर त्यांच्यावर प्रेम करते, असे सांगून त्यांना हॉटेलच्या खोलीत घेऊन गेली. त्यानंतर ते बाथरूममध्ये गेले असता त्यांच्याकडे असलेले परवानाधारक पिस्तूल, सॅमसंग फोल्ड–३ मोबाईल, सोन्याच्या तीन चेन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन कंपनीचे घडयाळ असा ४ लाख ७५ हजारांचा ऐवज घेऊन ती तेथून पळून गेली होती. या महिलेचा कोणताही मोबाईल फोन नंबर अथवा तिचा कोणताही पत्ता पाटील यांच्याकडे नव्हता. पाटील यांनी त्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून मानपाडा पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार फिर्यादी यांनी फेसबुकच्या माध्यमातून महिलेस संपर्क केला. त्यावरुन आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. तिचे फेसबुक अकाऊंट चेक करुन, तिच्या नावाची खात्री केली. त्यावेळी तिच्या नावावर आणखी एक गुन्हा असल्याचे आढळून आले. तसेच ही महिला खारला राहत असल्याचे समजले. मात्र, त्या पत्त्यावर गेल्यानंतर ही महिला गोवा येथे गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर गोवा येथून या महिलेला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीने मी चोरी करत असल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या वस्तू गोव्याला राहणाऱ्या साथीदाराला विक्रीसाठी देत असल्याचेही तिने सांगितले.
हेही वाचा :