ठाणे : ठाणे महापालिकेच्या आर्थिक स्थितीत चढ-उतार सुरूच असून महापालिकेला पुन्हा एकदा आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका ज्या प्राधिकरणांकडून पाणी विकत घेते त्या प्राधिकरणांची जवळपास १२ कोटींची बिले थकली असल्याची माहिती समोर आली आहे. ही बिले वेळेत न भरल्यास पालिकेला दंडासहित ही थकबाकी भरावी लागण्याची शक्यता आहे. मात्र दैनंदिन सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे पगार देण्यास प्राधान्य देण्यात आले असल्याने पाण्याची बिले देण्यात आली नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
ठाणे शहराला रोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर असा पाणी पुरवठा करण्यात येतो.
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा केला जातो.
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेमधून पाणीपुरवठा होत असला तरी हे पाणी पुरेसे नसल्याने स्टेम, एमआयडीसी आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला १२ ते १३ कोटी रुपये या प्राधिकरणांना मोजावी लागतात. सध्या महापालिकेला पुन्हा एकदा आर्थिक चणचण जाणवू लागल्याने ही प्राधिकरणाची बिलेही थकली आहे. लवकरच ही बिले देण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे ४० कोटी शिल्लक
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सध्याच्या घडीला अवघे ४० कोटीच शिल्लक असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिजोरीत ही रक्कम असणे आवश्यक आहे. दुसरीकडे दैनंदिन स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी कामगारांची देखील ५ ते ६ कोटींची बिले शिल्लक असून त्यांची बिले देण्यासाठी ही प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या आर्थिक घडी बसवण्यात ठाणे महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणेकर प्रत्येक महिन्याला पितात १२ कोटींचे विकतचे पाणी...
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून २५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असला तरी, इतर प्राधिकरणाकडूनही पालिकेला पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून ५.११ कोटी, एमआयडीसीकडून ४ कोटी, तर बृहन्मुंबई महापालिकेकडून ३ कोटी असे एकूण १२ कोटींचे पाणी विकत घ्यावे लागते.