Voter List Pudhari
ठाणे

Thane Voter Verification: आजपासून ठाणे जिल्ह्यात ७४ लाख मतदारांची पात्रता तपासणी

बीएलओंच्या तीन गृहभेटी, कागदपत्रे न दिल्यास नाव वगळण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांच्या पात्रतेची विशेष सखोल तपासणी आजपासून सुरू होत असून, पुढील महिनाभर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत.

३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ तीन वेळा गृहभेटी देणार असून, आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र भरून देणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास प्रारूप मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणूक आयोगाने मतदार यादीत केवळ पात्र नागरिकांचा समावेश आणि अपात्र व्यक्तींची नावे वगळण्याच्या उद्देशाने २४ वर्षांनंतर विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) हाती घेतले आहे.

पहिल्या टप्प्यात मतदार मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष घराघरात जाऊन पडताळणी सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ६,८९४ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठी ११,२६९ बीएलओ, १८ मतदार नोंदणी अधिकारी आणि २३२ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

महापालिकांच्या अतिरिक्त आयुक्तांनाही अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४३ लाख ३२ हजार ४७२ मतदारांचे (५८.१५ टक्के) मॅपिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये शहापूर मतदारसंघ ८१.४४ टक्क्यांसह अव्वल ठरला असून, भिवंडी ग्रामीण (७०.९५ टक्के) आणि उल्हासनगर (७०.४३ टक्के) यांचा क्रमांक त्यापाठोपाठ आहे.

तर ओवळा-माजिवडा मतदारसंघात सर्वात कमी ४८.०७ टक्के मॅपिंग झाले आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर ४ सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

'घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करा, आवश्यक कागदपत्रे दाखवा आणि मतदार यादीतील आपले नाव निश्चित करा,' असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

यातील एक कागदपत्र सादर करावे लागणार

मतदार पात्रता तपासणीसाठी घोषणापत्रासोबत आधार कार्ड, जन्मदाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, कायम निवासी प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र यांसह निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या १२ कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT