Bangladeshi minor girl sexual assault in Vasai Virar
विरार: वसई तालुक्यातील नायगाव पूर्व भागात मानवी तस्करीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल बारा वर्षांची बांगलादेशी मुलगी तीन महिन्यांच्या कालावधीत दोनशेहून अधिक व्यक्तींकडून अमानुष अत्याचाराला बळी पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलीस, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त कारवाईत ही मुलगी भीषण नरकयातनेतून मुक्त करण्यात आली.
ही कारवाई मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने, एक्झोडस रोड इंडिया फाऊंडेशन व हार्मनी फाऊंडेशन या संस्थांच्या मदतीने केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी बांगलादेशातून कोलकात्यात आणण्यात आली. तेथे बनावट कागदपत्रांची व्यवस्था करून तिचा ताबा घेण्यात आला. त्यानंतर गुजरातमधील नडियाद येथे काही दिवस ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याचे छायाचित्रण करून तिला धमकावत वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पुढे तिला मुंबईत आणून नायगावच्या स्टार सिटी परिसरातील वसाहतीत ठेवून रोज नव्या ग्राहकांकडे पाठवले जात होते.
पोलीस तपासात उघड झाले की, या काळात मुलीवर दोनशेहून अधिक ग्राहकांकडून लैंगिक अत्याचार झाले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ अतिशय भीषण होता. या प्रकरणात नऊ दलालांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये चार बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. अटक झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे — मोहम्मद खालिद बपरी (३३), जुबेर हारून शेख (३८), शमीम सरदार (३९), रुबी बेगम खालिद (२१), तसेच भारतीय नागरिक उज्जल कुंडू (३५), पर्वीन कुंडू (३२), प्रितीबेन मोहिदा (३७), निकेत पटेल (३५) आणि सोहेल शेख (२३).
ही कारवाई २६ जुलै रोजी झाली. सध्या अल्पवयीन मुलीला उल्हासनगर येथील बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून तिच्या प्रवास परवानगीपत्र व ओळखपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे वसई-विरार परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस तपास पुढे सुरू असून या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.