मिरा रोड : मिरा-भाईंदरमध्ये सुरू असलेल्या डान्स ग्रुपचे दुसऱ्या एका ग्रुपने नाव व ट्रेडमार्कचा गैरवापर करून विविध ठिकाणी स्पर्धेत भाग घेऊन फसवणूक केली आहे. तसेच ज्या ग्रुपचे नाव वापरले त्याच ग्रुपच्या संस्थापकांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी मिरारोड पोलिस ठाण्यात 29 जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी याच डान्स ग्रुप सदस्यांनी तक्रारदार सह कोरिओग्राफर रेमो डिसोझा सह त्यांची पत्नी लिझेल डिसोझा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता
भाईंदर येथे राहणारे तक्रारदार ओमप्रकाश चौहाण हे कोरिओग्राफर असून त्यांनी 2014 साली 'व्ही अनबिटेबल डान्स ग्रुप' स्थापन केला होता. चौहान हे भाईंदर पूर्वेच्या जेसलपार्क खाडी किनारी 2012 पासून मुला-मुलींसह डान्स ग्रुप बनवुन त्याठिकाणी डान्सचा सराव करत होते.
2014 साली त्यांच्या डान्स ग्रुपमधील एक विद्यार्थी विकास गुप्ता याचा स्टंट करताना अपघात होवुन तो मयत झाला होता. त्यानंतर 2015 साली ग्रुपचे नाव अनबिटेबल ऐवजी व्ही (विकास) अनबिटेबल असे ठेवले होते. या ग्रुपमध्ये सर्व गरीब व मध्यमवर्गीय मुले-मुली शिकण्यासाठी होती. या ग्रुपने 2019 मध्ये डान्स प्लस सिझन फोर या शो स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर या ग्रुपला अमेरीका गॉट टॅलेंट सिझन 14 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण आले. त्यामुळे व्ही (विकास) अनबिटेबल ग्रुपची नोंदणी करणे आवश्यक होते. त्यानुसार चौहान यांनी मे. व्ही. अनबिटेबल डान्स ग्रुप या नावाने व्यापार शासनाकडे नोंदणी केली होती. त्यांच्याकडे डान्स शो ला जाण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा तक्रारदार यांनी त्याची मोटार सायकल व उधारीवर पैसे घेऊन परदेशात जाण्याची व्यवस्था व पासपोर्ट, व्हिसा बनविले होते. अमेरिका गॉट टॅलेंट द चॅम्पियन सिझन 2 या स्पर्धेत या ग्रुपचा प्रथम क्रमांक आला होता.
चौहान यांनी 2014 मध्ये महेश मोरे याला व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले. त्यानंतर महेश याने ग्रुपचे सोशल मिडीया खाते, इमेल, युट्युब, इन्स्ट्राग्राम यांचे पासवर्ड बदलण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 2024 मध्ये महेश मोरे व ग्रुपमधील 25 विद्यार्थी हे कार्यक्रमात मिळणाऱ्या पैश्याचे वाटप व्यवस्थित होत नसल्याचे सांगत ग्रुप सोडुन गेले. त्यानंतर महेश याने विकास अनबीटेबल ड्रीम टिम एलएलपी नावाचा डान्स ग्रुप सुरू केला. त्यानंतर विकास अनबिटेल हे नाव वापरुन चुकीच्या मार्गाने काम मिळवुन पैसे कमावण्याचा उद्देश सुरू केला. मोरे व त्याच्या सहकाऱ्यांनी चौहान यांच्या ग्रुपच्या नावाने अनेक ठिकाणी स्पर्धेत भाग घेऊन पैसे कमवले आहेत. चौहान यांनी फसवणूक केली म्हणून गेल्या महिन्यात त्यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला होता. या डान्स ग्रुपच्या 29 जणांनी कटकारस्थान करून जबरदस्तीने चौहान यांच्या स्टुडीयोमध्ये जाऊन आरडाओरड केली व चौहान यांना मारहाण केली. चौहान यांच्या कंपनीचे नाव व ट्रेडमार्क महेश मोरे यांनी व इतर जणांनी मिळून कार्यक्रमाचे पॅम्पलेट कागदपत्रे चौहान यांची सही करुन सादर केले आहे.
तक्रारदार ओमप्रकाश चौहान यांच्या नावावर रजिस्टर असलेला व्ही अनबिटेबल डान्स ग्रुपचे नाव व चिन्ह विना परवानगी वापर करुन व व्ही. अनबिटेबल या डान्स कंपनीचा मालक असल्याचे भासवुन त्यांनी परदेशात दोहा, कतार येथे कार्यक्रम केले म्हणून महेश मोरे व त्यांचे सहकारी आकाश जैस्वाल, विर नटराजन, विशाल यादव, अनुश हरिजन, मोहम्मद आरिफ, अर्जुन वटार, अजय कांबळे, अभिषेक माले, आकाश चव्हाण, बादल घघात, डब्लू खरवार, कुमार नागय्या, रोहन थापा, चिरण विश्वकर्मा, दिनेश चौधरी, ओंकार माला, प्रवीण आरंक, प्रितेश भोईर, सागर मूर्ती, तृप्ती पिंगूलकर, सुरज सोनी, सचिन सोनी, प्रणित गायकवाड, वेदांत म्हात्रे, संजय चौहान, नंदिनी माले व आकाश सोनी आणि फिरोज खान यांच्यावर मिरा रोड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उज्वल आर्के हे करत आहेत.