ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा pudhari photo
ठाणे

Thane unseasonal rain storm : ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

झाडे कोसळली, वीजपुरवठा खंडित; कल्याण, टिटवाळा, मुरबाडला तडाखा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्यात तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर आणि मुरबाड परिसरात काही मिनिटांतच हवामानात मोठा बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, घरांचे पत्रे उडाले तर काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला.

कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथे दुपारी चारच्या सुमारास अचानक जोरदार वारे सुरू झाले. धुळीचे प्रचंड लोट हवेत उडत असल्याने वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण झाले. अनेकांनी सुरक्षिततेसाठी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली. वादळी वाऱ्यासोबत प्लास्टिक पिशव्या, कचरा आणि धूळ हवेत उडत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अनेक विक्रेत्यांचीही मोठी तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या. काही भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वांगणी आणि अंबरनाथ परिसरात अनेक घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या.

कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीवरील सिमेंट पत्रा उडून गोविंदवाडी मार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले. या घटनेत चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस ठाण्यात वारा शिरल्याने आतील प्लायवूड एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर पडले. सुदैवाने त्या थोडक्यात बचावल्या.

यावेळी वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा आणि फांद्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. काही भागात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

वांगणी परिसरात सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर आणि मुरबाड परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

प्रशासनाचे सावध राहण्याचे आवाहन

अचानक बदललेल्या हवामानामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान झाडांखाली किंवा जीर्ण इमारतीजवळ उभे राहू नये, असेही सांगण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाने 7 आणि 8 मे रोजी येलो अलर्ट जारी केला होता.

यंदा राज्यामध्ये पावसाचे आगमन उशिराने होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यापूर्वी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT