Youth Stabbed In Ulhasnagar
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ मधील गुजराती पाडा येथे राहणाऱ्या सुजल जाधव या तरुणावर रात्री चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजल जाधव हा रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या भाऊजींसोबत उल्हासनगर कॅम्प 3 येथील आचल बारमध्ये गेला होता. बारसमोर बाईकवरून उतरल्यानंतर मागून आलेल्या कारमधील तरुणांशी त्याचा वाद झाला. या वादातून आरोपींनी सुजलच्या डोक्यावर चाकूने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत सुजलने श्रीराम चौकाच्या दिशेने पळ काढला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस अंमलदार जितेंद्र चौधरी, सुभाष सुरवंशी आणि अनिल घुले हे गस्त घालत असताना आचल बारसमोर विरुद्ध दिशेला उभी असलेली पांढऱ्या रंगाची ऑरा कार त्यांच्या निदर्शनास आली. कारमधील संशयित व्यक्तीची झडती घेतली असता लोखंडी सुरा आणि चाकू आढळून आला.
पोलिसांनी प्रेम राजू चव्हाण याला ताब्यात घेतले असून, फरार आरोपी यश राजू चव्हाण याचा शोध सुरू आहे. कार आणि शस्त्रांसह एकूण 4 लाख 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.