Ulhasnagar MD drugs seizure
उल्हासनगर : शहरातील व्हिटीसी मैदान परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला विठ्ठलवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून ७ लाख २६ हजार रुपये किंमतीची ३६ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर हस्तगत करण्यात आली आहे.
उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली आहे. या अंतर्गत विठ्ठलवाडी पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना, एक व्यक्ती अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी व्हिटीसी मैदान परिसरात सापळा रचला.
संशयास्पद हालचाली करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ३६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. मोहम्मद इस्माईल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.