Bribery Case  Pudhari
ठाणे

Thane Bribery Case: अडीच लाखांची लाच घेताना उपसंचालक रंगेहाथ पकडल्या; ठाण्यात एसीबीची कारवाई

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र फाईल मंजुरीसाठी मागितली लाच; चरई येथील कार्यालयात सापळा रचून अटक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : कोकण विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती समोर आलेल्या जाती जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल जिल्हा स्तरावरून पुढे मार्गी लावण्यासाठी उपसंचालक (संशोधन) मिनाक्षी नारायण उन्हाळे यांनी तक्रारदाराकडून 2 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे ठाण्यातील चरई येथील एमटीएनएल इमारतीत कार्यालयात आहे. या कार्यालयात मिनाक्षी नारायण उन्हाळे (46) या उपसंचालक (संशोधन), वर्ग-1 या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांनी पत्नी आणि मुलीचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्रसाठी अर्ज केला होता. या अर्जाची पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी उन्हाळे यांनी अडीच

लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने 12 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड-अलिबाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार वर्ग होताच, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 13 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली, त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर 13 मार्च रोजी पथकाने चरई येथील कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून 2 लाख

50 हजार रुपयांची लाच आपल्या केबिनमध्ये स्वीकारताना मिनाक्षी उन्हाळे यांना पंचासमक्ष सायंकाळी 4.10 वाजता रंगेहाथ पकडण्यात आले.या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT