

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या तापमानाचा धोका लक्षात घेता वैद्यकीय आरोग्य विभागाने कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सतत दोन दिवस तापमान चाळिशीच्या टप्प्यावर गेल्यास त्या भागात उष्णतेची लाट असल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती दिली आहे.
मार्चच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. तापमान ४० अंशांच्या वर गेल्याचा हवामान विभागाचा इशारा आहे. कोरड्या हवामानामुळे उष्णतेत वाढ झाली असून अंगाची लाही लाही होत आहे. नागरिकांनी दुपारी ११ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळावे आणि हायड्रेटेड राहावे, असे आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी नागरिकांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
पुरेसे पाणी प्या : तहान नसली तरीही भरपूर पाणी प्या आणि प्रवासात नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा.
पोशाखाची काळजी : हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे आणि सैल सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर पडताना गॉगल, छत्री आणि पादत्राणांचा वापर करा.
थंडावा ठेवा : घराबाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा ओला कापड ठेवा. घरी पडदे, पंखे आणि कुलरच्या मदतीने वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
पाळीव प्राण्यांची काळजी : पाळीव पक्षी वा प्राण्यांना उन्हापासून वाचविण्यासाठी त्यांना सावलीत आणि थंड ठिकाणी ठेवा.
वेळेचे नियोजन : दुपारी उन्हाच्या तीव्रतेच्या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे आणि कष्टाची कामे करणे टाळा.
सुरक्षा : पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना चुकूनही ठेवू नका.
खाद्यपदार्थ आणि पेये : चहा, कॉफी, मद्य आणि सॉफ्ट ड्रिंक्स यांसारख्या पेयांचे सेवन टाळा. तसेच शिळे अन्न खाणे टाळा.