Thane Crime News
ठाणे : वाहतुकीचे नियमन करीत असतांना एका भरधाव रिक्षा चालकाने चक्क वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या अंगावर रिक्षा नेत जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी ठाण्यात घडली. या घटनेत ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रिक्षा चालकावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चितळसर पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली आहे.
ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ हे बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास एमजी हेक्टर शोरूमचे समोरील ठाणे कडून घोडबंदरकडे जाणाऱ्या रोडवर, मानपाडा येथे आपल्या गणवेशात वाहतूक नियमन करीत होते. यावेळी एक रिक्षा भरधाव वेगात जातांना शिरसाठ यांना दिसली. या रिक्षाच्या चालकास त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र रिक्षा चालकाने रिक्षा न थांबवता शिरसाठ यांच्या अंगावर वाहन नेले. यावेळी रिक्षाची जोरदार धडक बसल्याने शिरसाठ खाली पडले.
त्यांना डोक्यास व हातास गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्र.286/2025 भा.न्या.संहिता 2023 चे कलम 109,281,125 (अ),125 (ब), 132 सह मो.वा. का कलम 184,179,125 प्रमाणे गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सदर रिक्षा चालकास शोधून त्यास अटक केली. हेमंत संतोष वर्मा (27 वर्ष, धंदा रिक्षाचालक, रा.अजिंक्यतारा मंडळ चाळ, संजय टेलरचे बाजूला, साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या घटनेचा पुढील तपास चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे हे करीत आहेत.