शुभम साळुंके
नेवाळी : कल्याण शिळ रस्त्यावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह वाहतूक पोलिसांची ही डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चुकीच्या मार्गिकेतून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील पडले गावाजवळ वाहतूक पोलिसांनी रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी थेट चारचाकी वाहन रस्त्यावर आडवे लावले होते.वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचा सल्ला देत अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई देखिल करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट स्वतः कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.त्यांचे व्हिडिओ देखील शोधलं मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे कोंडीच्या समस्येवर वाहतूक विभागाकडून गांभीर्याने उपाययोजना केल्या जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः रॉंग साईडने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केल्याने वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होण्याची शक्यता आहे. कल्याण शिळ रस्त्यावर कल्याण फाटा,पडले परिसरात काही क्षणांच्या कोंडीत वाहनचालक चुकीच्या मार्गिकेतून प्रवास करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
या वाहतूक कोंडीतून मुक्ततेसाठी सुरु झालेल्या वाहतूक पोलिसांचा अभियान यशस्वी होतो का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत चित्र काहीसे वेगळे दिसत आहे. कल्याण-शीळ रस्त्यावर कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना कोंडी फोडण्यासाठी वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहनचालकांना अडवून कागदपत्रांची तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. काटई ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वाहतूक पोलीस वाहनचालकांना अडवून कोंडीत अधिकची भर टाकत आहेत.
तर काटई पाइपलाइन अंबरनाथ महामार्गावर खोणी चौक हा वाहतूक कोंडीचा नवा जंक्शन ठरत आहे. उंबार्ली ते खोणीदरम्यानही वाहनांच्या तपासणीवर भर दिला जात असला, तरी वाढत्या कोंडीवर कायमस्वरूपी वाहतूक नियोजनाची गरज आहे. तर नेवाळी चौकात देखील वाहतूक होत असताना वाहतूक पोलीस वाहनचालकांना अडवून कागदपत्र तपासून दंड वसुली करण्याच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसोबतच कोंडीच्या ठिकाणी वाहतूक नियमन करण्याची अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. " काटई ग्रामपंचायत ऑफिस जवळचे वाहतूक नियंत्रण तेथे बसून काय काम करतात ? जरा बंधुनो बघा तेथे आउटसाईडने जाणरांना मुभा व योग्य मार्गाने जाणरांना त्रास तसेच काटईला कार्यालयाजवळ ४/४, ५/५ जण कसले नियंत्रण करतात ते बघा " !