25 लाख लोकसंख्येच्या ठाण्यात साडेसोळा लाख वाहने pudhari photo
ठाणे

Thane traffic issue : 25 लाख लोकसंख्येच्या ठाण्यात साडेसोळा लाख वाहने

वाहतुकीचा गंभीर प्रश्न, सार्वजनिक वाहनाचा वापर करा : वाहतूक उपायुक्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंबई लगतचे असलेले ठाणे शहर हे मुंबईची प्रतिकृती मानली जाते. या शहरात बघताबघता शहराची लोकसंख्या 25 लाख पार गेली आहे तर वाहनांची संख्या ही 16.5 लाख एवढी झाल्याने ठाणे शहर हे वाहतूक कोंडीचे शहर होऊन बसले आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत ठाणे शहर वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

ठाण्यात दळवळणासाठी सुमारे 380 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये पुर्वद्रुतगती महामार्ग, मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसेच वर्दळीच्या घोडबंदर रोडचा समावेश होतो. ठाणे शहरांतर्गत असलेले अनेक जुने रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत. त्यात पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्रास रस्त्यांवरच वाहने पार्क केली जातात. याशिवाय कामावर जाणारे चाकरमानी आणि उद्योग व्यवसायाकरीता शहरात येणारी जड - अवजड व्यावसायिक वाहने देखील रस्त्यांवर मिळेल त्या जागेत तासनतास उभी केली जातात.

जुन्या ठाण्यात तर पार्किंगची समस्या गहन आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतुक कोंडीची झळ अंतर्गत शहरालाही बसते. अनेक छोट्या इमारतींचा पुर्नविकास होऊन मोठमोठे टॉवर उभे राहात आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकसंख्ये सोबतच वाहनांच्या संख्येत देखील पाचपट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील अन्य मुख्य रस्ते व घोडबंदर रोडवर ठाणे महापालिका, मेट्रो आदी विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांमुळे आणि अनेकदा होणाऱ्या अपघात - दुर्घटनांच्या घटनांमुळे वारंवार अडथळे उद्भवून वाहतूक खोळंबून पडते. अशा सर्व अडचणींना सामोरे जात ठाणे शहर वाहतूक विभाग उपलब्ध मनुष्यबळाच्या आणि ट्राफिक वॉर्डनच्या सोबतीने रस्त्यांवर अविरत कार्यरत आहे. परंतु, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुक नियमन करताना वाहतुक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

प्रति माणशी एक वाहन

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या पाहता ठाण्यातील प्रती माणशी एक वाहन अशी परिस्थिती दिसून येत आहे. यात 2 लाख 78 हजार ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या असून नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या 13 लाख 72 हजार 679 इतकी आहे. आजघडीला 16 लाख 51 हजार 384 वाहने ठाण्यात धावत आहेत. या वाहनांव्यतिरिक्त 15 वर्षे कालावधी संपलेली बेकायदा वाहनेही उदंड आहेत.

ठाणे प्रादेशिक परिवहनच्या नोंदीनुसार

टी परमीट कॅब -39,658

पीकअप टेंपो - 1,38,162

रुग्णवाहिका - 1,112

ऑटो रिक्षा - 89,047

दुचाकी - 10,42,307

चारचाकी - 315985

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने रस्ते व पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे वाहतुक कोंडी बरोबरच धुळ व हवा प्रदुषणाची समस्या देखील वाढत आहे. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुक सेवेचा उपयोग केल्यास या समस्या काही अंशी कमी होईल.
पंकज शिरसाट, उपायुक्त वाहतुक शाखा, ठाणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT