

मुंबई : प्लास्टिक हे लवचिकता व प्रसारण क्षमतेसाठी ओळखले जात असले, तरी त्यावर वारंवार प्रक्रिया केल्यानंतर त्यामध्ये निर्माण होणाऱ्या प्रवाह प्रतिरोधामुळे प्लास्टिक अधिक घट्ट व जाड बनतात. या जाड प्लास्टिकचा पुनर्वापर करणे हे प्लास्टिक उद्योगासमोर एक मोठे आव्हान होते. या समस्येवर मात करण्यासाठी, आयआयटीतील संशोधकांनी समुद्राच्या लाटारोधक काँक्रिटच्या टेट्रापॉड आकाराचे नॅनोकण वापरून पॉलिमरचा प्रवाहीपणा वाढवण्यात यश मिळवले आहे.
आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूर येथील संशोधकांच्या एकत्रितरित्या घट्ट व जाड प्लास्टिकसंदर्भात केलेल्या संशेाधनामध्ये पॉलिमरांच्या प्रवाहीपणासंबंधी नवीन दिशादर्शक माहिती उघडकीस आली. पॉलिमरमध्ये टेट्रापॉड आकाराचे नॅनोकण मिसळल्याने त्याच्या प्रवाहीपणात सुधारणा होत असल्याचे दिसून आले. आयआयटी मुंबईतील ‘लॅब ऑफ सॉफ्ट इंटरफेसेस’च्या प्रमुख प्रा. मिठुन चौधुरी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.
या संशोधनासाठी आयआयटी मुंबईचे प्रा. अनिंद्य दत्ता, आयआयटी मद्रासचे प्रा. तारक के. पात्रा आणि आयआयटी कानपूरचे प्रा. शिवसुरेंदर चंद्रन यांचे सहकार्य लाभले. तसेच आयआयटी मुंबईतील ज्योतिप्रिय सरकार, मिथुन मधुसूदनन, हर्षित यादव, डॉ. फरियाद अली, आयआयटी मद्रासमधील डॉ. सचिन एम. बी. गौतम यांनी प्रायोगिक आणि विश्लेषणात्मक काम पाहिले आहे.
या संशोधनामुळे भविष्यात प्लास्टिक प्रक्रियेसाठी लागणारी ऊर्जेची मागणी कमी करता येऊ शकेल. परंतु, यासाठी शाश्वत पद्धतीने आणि कॅडमियमसारख्या विषारी पदार्थांऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करून अचूक आकाराचे नॅनोकण मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचे आव्हान शिल्लक आहे. त्यामुळे संशोधकांकडून आता अन्य पॉलिमर आणि अधिक गुंतागुंतीच्या नॅनोकणांच्या आकारांवर प्रयोग करण्यात येत आहे, अशी माहिती प्रा. चौधुरी यांनी दिली.