ठाणे: जनगणनेच्या कामासाठी नकार देणाऱ्या ठाण्यातील 12 हुन अधिक शिक्षकांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनगणनाच्या कामासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाला गैरहजर राहत शिक्षकांनी विरोध दर्शविल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने कारवाईची माहीम हाती घेत शिक्षकांवर गुन्हा दाखल केला.
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळांमधील शिक्षकांवर दिव्यातील जनणगनेच्या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये ड्राय - ड्रॉप इंग्लिश स्कूल, ग्लोबल इंग्लिश स्कूल आणि साऊथ इंडियन स्कूल या शाळांतील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते.
दरम्यान, या तीन शाळांमधील शिक्षकांनी जनगणना 2027 च्या कामासाठी आयोजित प्रशिक्षणाला गैरहजर राहत विरोध केला. या प्रकरणी 12 हून अधिक शिक्षकांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जनगणना प्रक्रियेत हलगर्जी केल्याप्रकरणी शिक्षकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
प्रशिक्षणासाठी वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत संबंधित शिक्षकांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनगणना कामात हलगर्जी करणाऱ्यांविरोधात पुढील काळात आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
1 हजार पर्यवेक्षक जुंपले कामाला ठाणे महापालिकेने 23 एप्रिलपासून जनगणनेसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू केली होती. यामध्ये दिव्यात एकूण 28 बॅच तयार करण्यात आल्या आहेत. एका बॅचमध्ये एकूण 50 जणांचा समावेश असून आतापर्यंत 28 बॅच प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात 11 बॅचला ट्रेनिंग देण्यात येणार आहे. दिवा प्रभाग समिती हद्दीतील जनगणनेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून 1 हजार 750 कमर्चारी जुंपले आहे.