जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात होणार रूपांतर pudhari photo
ठाणे

Thane District Hospital : जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात होणार रूपांतर

रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना अद्ययावत आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्यात येत असून, रुग्णालयाचे बांधकाम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यातील उर्वरित कामे देखील जलदगतीने पूर्णत्वास नेऊन रुग्णालय नागरिकांसाठी खुले करून देण्यात यावे. यासाठी सर्व यंत्रणानी एकत्रितरित्या काम करावे, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांना सूचना केल्या. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे अनेक वर्षांपासून ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्वाचे आरोग्य केंद्र ठरत आहे.

ठाण्यातील कोर्टनाका परिसरात कार्यरत असलेल्या या रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असत. मात्र, कालांतराने इमारतीचे बांधकाम जुने झाल्यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने रुग्णालयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम सुरू असताना रुग्णसेवा खंडित होऊ नये म्हणून रुग्णालय सध्या तात्पुरत्या स्वरूपात ठाणे मनोरुग्णालयाजवळ हलविण्यात आले आहे. येथे देखील ठाणे, रायगड तसेच इतर जिल्ह्यांमधील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत आहेत. या रुग्णालयाच्या कामाची पाहणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी केली.

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी

यावेळी रुग्णालयाच्या कामावर आणि पाहणीवेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही इथे आलो आहोत, पण तुमच्यातील कुणीच नाही, म्हणजे तुम्ही ग्रेट माणसे आहात, अशा शब्दात प्रकाश आबिटकर यांनी गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना खडसावले. या पाहणी दौऱ्यामुळे ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा आणि तेथील प्रशासकीय कामकाजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसेच या रुग्णालयाला लागणाऱ्या स्वतंत्र वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत यावेळी मंत्री आबिटकर यांनी नाराजी व्यक्त करत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.

असे असेल नवे रुग्णालय...

नव्या आराखड्यानुसार येथे 500 खाटांचे जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचे महिला रुग्णालय आणि 200 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय अशा एकूण 900 खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहेत. सध्या या बांधकामातील 90 टक्के काम पूर्ण झाले असून अंतर्गत विद्युतीकरण व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसविण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा असून, नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे.

नवीन 1078 पदांची भरती

या 900 खाटांच्या या रुग्णालयासाठी तब्बल 1078 नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता दोन्ही लक्षणीयरीत्या वाढणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT