ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत जानेवारी ते ऑकटोबर 2025 या दहा महिन्यात 12 हजार 455 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचा घटना घडल्या आहेत. ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला असून लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना भटके कुत्रे आपले लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावरून चालताना किंवा मोटारसायकल वरून जात असताना अंगावर येणे, गाड्यांच्या मागे धावणे, घोळक्याने हल्ला करणे असे प्रकार उघडकीस आले आहेत.या भटक्या कुत्र्यांनी 1 जानेवारी ते 30 ऑक्टोंबर याकालावधीत 12 हजार 455 जणांना लक्ष केले असल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे.
या सर्व रुग्णावर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि 33 आरोग्य केंद्रात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार झालेल्यांची संख्या अधिकची असू शकते.
दरम्यान महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि 33 आरोग्य केंद्रात रेबीज वरील लस उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दप्तरी भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याची नोंद ही दिवसाला केवळ 50 ते 60 पर्यंत असते. त्यांची ही शासकीय आकडेवारी आहे .यात खासगी डॉक्टरांकडे उपचार घेण्याऱ्यांची नोंद नसते. विशेष म्हणजे रिक्षा चालक, गस्तीवर असणारे पोलीस, पेपर विक्रेते यांच्यावरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना करत आहेत लक्ष्य
भटक्या श्वानांची संख्या ठाणे महापालिका हद्दीत मोठया प्रमाणावर वाढली आहे. या भटक्या श्वानांनी आतापर्यंत अनेक नागरिकांवर हल्ला करून चावा घेतला आहे. त्यांचे प्रमुख लक्ष हे लहान मुले आणि जेष्ठ नागरिक ठरत आहेत. परिणामी त्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
14 नोव्हेंबरपासून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला सुरुवात
ठाणे महापालिका हद्दीत भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. हे श्वान लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना लक्ष करत आहेत. मागील काही दिवसापासून संथ गतीने सुरु असलेली भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम 14 नोव्हेंबरपासून जोर धरणार आहे. याकरिता ठाणे महापालिकेने दोन विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. त्या माध्यमातून ही निर्बीजीकरणाची मोहीम गतीने राबवली जाणार आहे.