ठाणे

Thane News : कल्याण-शिळ मार्गावर तस्कर-पोलिसांत धुमश्चक्री; वाघाच्या कातड्यासह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-शिळ महामार्गावर वन्य प्राण्याच्या कातड्यासह अग्निशस्त्र तस्कर येणार असल्याची पक्की खबर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 7 जणांच्या पथकाने एका हॉटेलजवळ सापळा लावला. यावेळी क्राईम ब्रँचचे पथक आणि तस्करांमध्ये जोरदार झटापट झाली. अखेर दोघा तस्करांना जेरबंद करण्यात क्राईम ब्रँचला मोठे यश आले. या तस्करांकडून कार आणि पट्टेरी वाघाच्या कातड्यासह लोडेड पिस्तूल असा 42 लाख 52 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Thane News

सिताराम रावण नेरपगार (वय 51, रा. रिध्दीसिध्दी कॉलनी, तुळजाभवानी नगर, चोपडा, जि. जळगाव) आणि ब्रिजलाल साईसिंग पावरा (वय 22, रा. मु. पो. कोडीत, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत. त्यांना कल्याण कोर्टात हजर केले असता  27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. Thane News

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कल्याण-शिळ महामार्गावरील सोनारपाडा गावाजवळ असलेल्या क्लासिक नामक हॉटेलच्या पार्किंगमध्ये दोन जण वन्य प्राण्याच्या कातड्यासह येणार असल्याची खबर हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडू, विनोद चन्ने यांच्यावर त्यांना पकडण्याची जबाबदारी सोपविली.

गुप्तहेराने दिलेल्या माहितीनुसार दोघेजण हॉटेलच्या पार्किंगमध्ये कारसह आले. पथकाने तत्काळ कारभोवती वेढा घातला. पोलिसांनी फिल्डींग लावल्याची चाहूल लागताच दोन्ही बदमाशांनी तेथून धूम ठोकली. बदमाशांजवळ अग्निशस्त्र असल्याने कोणत्याही क्षणी गोळीबार होण्याची चिन्हे दिसत असतानाही या पथकाने जीवाची पर्वा न करता पाठलाग केला. अखेर फर्लांगभर अंतरावर दोघा बदमाशांच्या जागीच मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून MH 27/ए सी/4075 क्रमांकाच्या कारसह पट्टेरी वाघाचे कातडे, 2 काडतूसे लोड केलेले देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मोबाईल असा 42 लाख 52 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यासह विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News  : धुळे-जळगावचे डोंबिवलीशी तस्करी कनेक्शन

अटक केलेले दोघे जण वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रहिवासी जरी असले तरी त्यांचे डोंबिवलीतील खरेदीदारांशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले आहे. अग्निशस्त्र आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करून ते डोंबिवली परिसरात आणून विक्री करण्याचा या दोघांचा डाव होता. मात्र, क्राईम ब्रँचने हा डाव हाणून पाडला. लोडेड पिस्तूल आणि पट्टेरी वाघाचे कातडे कुठून आणले ? त्याची कुणाला विक्री केली जाणार होती ? आदी माहिती 27 जानेवारीपूर्वी मिळण्याची क्राईम ब्रँचला अपेक्षा आहे.

वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक

पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप चव्हाण, हवा. दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विनोद चेन्ने,आणि विलास कडू या सात जणांच्या पथकाने जीवाची बाजी लावली. कल्याणच्या वन विभागाचे वनपाल राजू शिंदे आणि वनरक्षक महादेव सांवत यांनी या पथकाला मदत केली. धाडसी कारवाई करणाऱ्या या पथकाचे ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश सोनावणे, आदी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT