ठाणे: ठाणे जिल्ह्यात ‘एसआयआर’ विशेष सखोल मतदार यादी फेरतपासणी मोहिमेला वेग आला आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेंतर्गत ७ ऑगस्ट अखेर ठाणे विभागातील ६६ लाख ४९ हजार ७५३ मतदारांपर्यंत मतदार पडताळणी अर्ज पोहोचविण्यात आले आहेत.
एकूण ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांपैकी बहुतांश मतदारांपर्यंत प्रशासन पोहोचले असून, मतदार पडताळणीचे काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
विशेष सखोल मतदार यादी फेरतपासणी मोहीम ही मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणारी प्रक्रिया आहे. यात प्रत्येक पात्र मतदाराच्या घरी जाऊन बूथस्तरीय ऑफिसर (बीएलओ) मतदार पडताळणी अर्ज वितरित करतात. त्या माध्यमातून मतदाराची माहिती, पत्ता, नाव, कुटुंबीयांची माहिती व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
नव्या मतदारांची नोंदणी, स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे, मृत मतदारांची नावे वगळणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. ठाणे विभागातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६,८९४ बीएलओ ही मोहीम राबवत आहेत.
६ ऑगस्टपर्यंत ६५ लाख ५१ हजार ९८० अर्जांचे वितरण झाले होते. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी एका दिवसात ९७,७७३ अर्जांचे वितरण करण्यात आल्याने वितरित अर्जांची एकूण संख्या ६६ लाख ४९ हजार ७५३ इतकी झाली आहे.
अर्ज वितरणानंतर त्यांची ऑनलाइन नोंदणीचे कामही वेगाने सुरू आहे. ७ ऑगस्टपर्यंत ३९ लाख ७१ हजार ९८९ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, एका दिवसात ९० हजार २० फॉर्म ऑनलाइन प्रणालीत नोंदविण्यात आले आहेत. या टप्प्यात १.२१ टक्के प्रगती नोंदविण्यात आली आहे.
मुरबाड मतदारसंघ आघाडीवर
मतदारसंघनिहाय मुरबाड विधानसभा मतदारसंघ एका दिवसात सर्वाधिक १३ हजार ७९६ फॉर्मचे वितरण झाले, तर भिवंडी पश्चिमने २.८७ टक्क्यांसह वितरणातील सर्वाधिक प्रगती नोंदवली. डिजिटायझेशनमध्ये उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाने २.४९ टक्क्यांसह आघाडी घेतली आहे. एका दिवसात ७,३३३ अर्ज ऑनलाइन नोंदविण्यात आले. प्रत्येक पात्र मतदाराने बीएलओंना आवश्यक सहकार्य करून पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.