ठाणे: राज्यातील झालेल्या आणि होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील ७४ लाख ७२ हजार मतदारांपैकी तब्बल १९ लाख २ हजार ४१६ पात्र मतदारांनी प्रगणना अर्जच भरले नसल्याची धक्कादायक माहिती मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातून पुढे आली आहे.
दरम्यान, अशा पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने आणखी एक संधी देत ३० नोहेंबरपर्यंत प्रगणना अर्ज भरण्याची मुदत दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली.
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी ठाणे जिल्ह्यात एकूण मतदार संख्या ७४ लाख ७२ हजार २७० इतकी होती. निवडणूक आयोगाने एसआयआर कार्यक्रम सुरु केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ७०६ मतदार मृत तर ७ लाख ३५ हजार १४४ कायमचे स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर जिल्ह्यातील ४७ लाख २१ हजार ८७७ मतदारांची प्रारूप यादी तयार झालेली आहे. त्यामध्ये ८३ हजार ४५५ नवीन मतदारांचा समावेश आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील तब्बल १९ लाख २ हजार ४१६ पात्र मतदारांनी 'एन्यूमरेशन फॉर्म'च (प्रगणना अर्ज) बीएलओकडे जमाच केले नाहीत.
त्यामुळे या पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने आणखी एक संधी दिली असून त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून द्यायचा आहे. प्रगणना अर्जासोबत परिशिष्ट ब अथवा क भरून द्यायचे आहे. या मतदारांच्या घरी पुन्हा बीएलओ भेटी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिली आहे.
तरी मतदारांनी अर्ज भरून द्यावेत असे आवाहन केले आहे. पूर्वी ज्या मतदाराने इएफ (एन्यूमरेशन फॉर्म')भरून दिलेला नाही अशा मतदारांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट ब सादर करावा.
ज्या मतदारांनी राज्यांतर्गत राहण्याचे ठिकाण बदलल्यामुळे पूर्वी गणना प्रपत्र सादर न करू शकलेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत परिस्थिष्ट क सादर करायचे आहे. त्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पांचाळ यांनी केले आहे.
दुसरीकडे निवडणूक आयोगाने देशभरात दोन ठिकाणी जर कुणाची मतदार नोंदणी असेल तर एकाच ठिकाणी मतदार राहता येईल, दुसऱ्या ठिकाणची नोंदणी रद्द केली जाईल असे स्पष्ट करीत मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील तब्बल ४१ हजार ३३ मतदारांनी बीएलओकडे मतदार गणना प्रपत्र भरून देण्यास चक्क नकार दिला आहे.
उर्वरीत १८ लाख ६९ हजार मतदारांनी अर्ज भरलेले नाहीत. याचा अर्थ ठाणे जिल्ह्यातील लाखो मतदारांनी आपापल्या गावाला, राज्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात एसआयआर कार्यक्रम लागू होण्यापूर्वी दिल्ली, बिहार, आसाम, केरळ, पॉंडिचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल निवडणुका झाल्या.
तर २०२७ मध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, पंजाब, गोवा मणिपूर या राज्याच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाखो मतदारांनी ठाणे जिल्ह्यातील १८ मतदार संघात मतदार यादीचे गणना प्रपत्र भरले नसावेत, अशी शंका येऊ लागली आहे. तरी देखील ३० नोव्हेम्बरपर्यंत किती पात्र मतदार हे गणना प्रपत्र भरतात यावरून सगळे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान जिल्हा उपनिवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात पुरुष मतदारांची संख्या २३ लाख ५० हजार ७९५ तर महिला मतदारांची संख्या २२ लाख ३९ हजार ६४९ एवढी आहे. याशिवाय जिल्ह्यात ६९४ इतर मतदार, १ हजार ६ अनिवासी भारतीय मतदार, २५ हजार ३७३ दिव्यांग मतदार आणि १९ हजार ३४७ ज्येष्ठ नागरिक (वय ८५ वर्षांपेक्षा जास्त) मतदारांची नोंद आहे. जिल्ह्याचा सरासरी जेंडर रेशिओ ९५३ इतका आहे.