ठाणे : भावेवीण भक्ति । भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये
अशा अभंगांतून ज्ञानेश्वरांनी भक्तीयोगाची महती विषद केली आहे. भक्तीयोगावर ज्ञानेश्वरीचे अभ्यासक कृष्णा जाधव यांनी सर्व भक्तांसमोर विवेचन ठेवले. निमित्त होते, श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यातील ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग यावरील विवेचनाचे.
काम क्रोध याचा नाश करून जे अद्वैत आपल्या हाती सापडते त्याचे पुढचे रूप भक्ती रूप असते. भक्तांमध्येही अनेक प्रकार दिसतात. आर्थिक म्हणजे धनसंपत्तीसाठी केलेली भक्ती, दुसरी दुःख हरण करण्यासाठी केलेली भक्ती. तिसरी परमेश्वरी परी असलेली जीज्ञासा यासाठी केलेली भक्ती आणि चौथी या सर्व लोभ, प्रेम या पलीकडे जाउन ज्ञानातून विजय प्राप्त केल्यानंतर ब्रम्हांडाची झालेली ओळख ती भक्ती. यातून आपल्याला देवत्वाची प्रचिती येते. ज्ञानेश्वर माउलींनी गीतासाराचे विवेचन करताना कुठली भक्ती श्रेष्ठ याचा ठाव घेतला आहे. ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवून द्वेष मद मत्सर यावर मात करून जे माणसाकडे साधुत्व येते. सन्यस्ताची भूमिका येते, त्यातून अखंड जमिनीचा, पाण्याचा, अवकाशाचा वेध घेण्याची शक्ती या सपुरुषांमध्ये निर्माण होते. ज्ञानोबाही देवाचेच अवतार होते. त्यांनी भक्तांसाठी एक मुक्तीचा विचार ठेवला.
सायास करिसी प्रपंच दिन निरसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे यातून ज्ञानेश्वरांनी भक्ती वाचून मुक्ती नाही असा संदेश दिला आहे. स्वच्छ मनाने स्वच्छ आचरणाने आणि अगदी मनापासून केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचते. पंढरीचा विठोबा ते सावळे रूप भक्तांच्या प्रती आस्था बाळगणारे त्यांच्या मागे सतत उभे राहणारे असे रूप जे हजारो भक्तांना द्वैताकडून अद्वैताकडे नेणारे असते.
सावळ्या विठोबाच्या चरणी हजारो वारकरी जाउन नतमस्तक होतात, तेव्हा हे विठुराया मी आलो रे ची हाक देतात, तेव्हा त्या सावळ्या रूपात तो भक्त एकरूप होतो. ही एकरूपता भक्तीचा अत्युच्च बिंदू आहे. खरं तर जिथे प्रेम आहे, तिथे भीती नसते आणि जिथे भीती असते तिथे प्रेम नसते. खरं तर आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपला प्रपंच मुलं बाळं यासह सात पिढ्यांचा विचार करून धनसंचय करतो. माणूस सोडला तर कुठलाही योनीतील प्राणी हा संचय करत नाही.
ज्ञानेश्वरांनी जो भक्तीयोग सांगितला आहे. जे ब्रम्हचर्य सांगितले आहे, त्यामध्ये माझं जे आहे, तेच मी घेईन दुसरे घेणार नाही. मला जेवढं हवं तेवढंच माझ्यापाशी ठेवेन बाकी मी दान करेन ही वृत्ती जो भक्त घेतो, त्याचे जो अनुकरण करतो, तोच भक्तीचा अत्युच्च बिंदू ठरू शकतो. देवत्वाला पोहोचण्याचा तो मार्ग आहे आणि या गोष्टी ज्ञानेश्वरांनी साध्या सोप्या भाषेमध्ये भक्तांसमोर ठेवल्या आहेत. जे भक्त हे सर्व स्वीकारून पुढे जातात, त्यांना मोक्षाचा मार्ग सापडतो. ज्ञानेश्वरांनी जे आपल्या अभंगातून सांगितले आहे, त्याचा अर्थ संत तुकारामांच्या अभंगातही सापडतो. तुकाराम महाराजांनी संत ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेचा एक मूलतत्व घेऊ न सांगितले, ते असे,
भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी, हेच तत्वज्ञान गीतेमध्ये श्रीकृष्णाने मांडले आहे. महाभारताच्या युद्धामध्ये जो अविचार होता, त्याचा शेवट करण्यासाठी श्रीकृष्ण पुढे आले. हा सर्व भक्तीच्या मार्गातला प्रवास आहे.