ठाणे : पुण्याहून (स्वारगेट) हून सकाळी निघालेल्या ठाणे मार्गे वसईला निघालेल्या शिवशाही बसने ठाणे महापालिकेच्या सॅटिस पुलावर अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत 14 प्रवासी, चालक-वाहक आणि पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांसह चालक-वाहक सुखरूप बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
अपघात आणि दुर्घटनामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत असलेल्या शिवशाही बस कायम चर्चेत असतात. पालघर आगाराची स्वारगेट (पुणे) वरून वसईला जाणारी शिवशाही बस (क्रमांक - एम. एच. 09 - ईएम - 9942) सकाळी 8 च्या सुमारास सुटली. दुपारी 1.20 च्या सुमारास ही बस एस.टी.च्या ठाणे स्टेशन येथील बसस्थानकात आली. चालक संतोष गवळी यांनी बसची नोंद केल्यावर सॅटिस पुलावर बस चढत असतांना बसच्या एसीचे अल्टरनेटर जाम झाल्याने त्यातील वायरिंग जळाल्याने ही आग लागली.
चालक गवळी आणि वाहक मिलिंद सोनवणे यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. यावेळी ठाणे स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक हवालदार वैभव दळवी यांनी पुलावर धुराचे लोट पाहून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले, यंत्र अभियंते विवेक लोंढे, विभागीय वाहतूक अधिकारी धनंजय शिंदे, आगार व्यवस्थापक वाघोले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कोल्हे, वाहतूक नियंत्रक कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नगरसेवक संजय वाघुले, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी व ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या आधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी अग्निशमन केंद्रातील सागर शिंगे आणि पी. डी. भोई यांनी ही आग आटोक्यात आणली.
दागिने मिळाले परत
बसमध्ये वल्लभनगर येथून बसलेल्या शिंदे यांना वापी येथे जायचे होते. त्यांच्याकडे खरेदी केलेले दागिने होते.आग विझताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची बॅग त्यांच्या हवाली केली. त्यात त्यांचे दागिने त्यांना हवाली करण्यात आले.
मोठी दुर्घटना टळली
ठाणे स्टेशन परिसरातील सॅटीस पुलावर ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या तसेच एस. टी. महामंडळाच्या बसेसची दिवसभर वर्दळ असते. दुपारी 4 नंतर बसेसच्या लांबलचक रांगा असतात. बसच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी उतरून रेल्वे स्टेशनसाठी चालत जातात. शिवशाही बसला आग लागण्याची घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. त्यावेळी सायंकाळच्या तुलनेत बसची रांग आणि प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने ठाणे अग्निशमन दलाला मदत कार्यात फारसा अडथळा आला नाही, प्रवाशांची वर्दळही दुपार असल्याने तुलनेत कमी होती, अन्यथा अशा दुर्घटनांच्या वेळी होणाऱ्या गडबड गोंधळामुळे दुर्घटनांना वेगळे वळण लागते, मात्र गर्दीची वेळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली.