भर पावसात रात्रीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य मदत सुरू केली. pudhari photo
ठाणे

ठाणे : सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनेला कलाटणी, कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Saptashrungi Building Accident: दुर्घटनेसह मृत्युकांडाला जबाबदार घरमालकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

Saptashrungi Building Accident

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील चिकणीपाड्यात असलेल्या सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ रहिवाशांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कृष्णा चौरसिया या घरमालकाने फ्लोरिंगचे काम सुरू केले होते. त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून दुर्घटनेसह मृत्युकांडाला जबाबदार ठरलेला घरमालक कृष्णा चौरसिया याला अटक केली आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास चिकणीपाड्यातील सप्तशृंगी या पाच मजली इमारतीच्या चौथा मजल्यावरील स्लॅब कोसळला. हा स्लॅब तळमजल्यापर्यंत असलेल्या स्लॅबवर कोसळत आला. या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले, तर ६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक/अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे या दुर्घटनेनंतर केडीएमसीने या सप्तशृंगी इमारतीसह आजूबाजूच्या चाळी रिकाम्या केल्या आहेत. या इमारतीसह आसपासच्या बैठ्या चाळींतील रहिवाशांचे कल्याण पूर्वेकडील जवळच्या शाळांमध्ये तात्पुरते पुनर्वसन केले आहे. तर दुसरीकडे या मृत्यूकांडाच्या अनुषंगाने केडीएमसीच्या जे प्रभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इमारतीतील फ्लॅट क्र. ४०१ चे मालक कृष्णा लालचंद चौरसिया याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्घटनेनंतर त्याच रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन भाजपाचे कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण त्यांच्या लवाजम्यासह घटनास्थळी हजर झाले. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येणार असून इमारतीतील रहिवाश्यांना तात्पुरता निवारा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी मदतकार्याला सुरूवात केली. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरातील, विशेषतः झोपड्यांमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. दाटीवाटीच्या वस्ती आणि त्यातच रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला असतानादेखिल आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांना दिलासा दिला.

फ्लोअरिंगच्या कामाने दिले काळाला निमंत्रण

दोन दिवसांपूर्वी सप्तश्रृंगीच्या चौथ्या मजल्यावर राहणारे कृष्णा चौरसिया याच्या घरी फ्लोअरिंगचे काम सुरू करण्यात आले होते. याच कामाच्या माध्यमातून काळाला आपसूकच निमंत्रण मिळाले. चौरसिया याने इमारतीमधील पदाधिकारी वा केडीएमसीकडून परवानगी घेतली नव्हती. काम सुरू असतानाच स्लॅब कोसळला. या संदर्भात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात कृष्णा चौरसिया यांच्याविरोधात निष्काळजीपणा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मृत्युकांडाला जबाबदार ठरलेला घरमालक कृष्णा चौरसिया याला अटक करण्यात आली आहे.

मृत्युकांडाची शासनाकडून गंभीर दखल

६ निष्पाप रहिवाशांचे बळी गेल्याने शासनाने या मृत्युकांडाची गंभीर दखल घेतली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक दुर्घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने केलेले सूक्ष्म निरीक्षण नोंदवून या इमारतीमधील रेती-सिमेंट, विटा, टाईल्स, मातीचे नमूने ताब्यात घेतले. रासायनिक पृथःकरणाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT