नेवाळी : शुभम साळुंके
कोकण सागरी किनारपट्टीला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे. अंबरनाथ तालुक्यात असलेल्या अतिसंवेदनशील परिसरात ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने बंदी असलेल्या परिसरात सर्रास रिल्स बनविण्यासाठी ड्रोनद्वारे व्हीडिओ तयार केल्या जात आहेत. मात्र हा प्रकार तपास यंत्रणांच्या नजरेत येत नसल्याने आता जिल्हाधिकार्यांना गार्हाणे घालून सामाजिक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकार्यांच्या सुरक्षेसंदर्भात बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याचा परिसर सुरक्षेतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ओळखला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात झपाट्याने अनधिकृत चाळींची निर्मिती झाल्याने नागरिकीकरण झपाट्याने वाढले आहे. या परिसरातील अमली पदार्थांची विक्री, संशयित दहशतवादी पाहता आता युट्युबर्सकडून परवानगी नसलेल्या परिसरात ड्रोनच्या घिरट्या मारल्या जात आहेत.
श्री मलंगगड भागातील चिंचवली परिसरात असलेल्या कंपनी जवळ आणि श्री मलंगगडच्या डोंगराळ भागात ड्रोन उडवले जात आहेत. मात्र संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागासह शहरी भागाची सुरक्षा देखील रामभरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोशल मीडियावर व्हीडिओ टाकून प्रसिद्धी मिळविण्यासाठी सर्रास ड्रोन हवेत उडवले जात आहेत. मात्र या प्रकारांमुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांसाठी डोकेदुखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातील बंदीचे आदेश मात्र कागदावरच काढले जात आहेत.
सागरी किनारपट्टीला लागूनच अंबरनाथ हा तालुका आहे. तालुक्यात असणारे भले मोठे औद्योगिक क्षेत्र, भारतीय वायू सेनेची प्रयोग शाळा तसेच चिंचवली येथील तळ तसेच बीएआरसी चिंचवली, ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर शहर व रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या ड्रोनच्या घिरट्यांवर नजर ठेवण्याची तसेच कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.मात्र सध्या अपुरे मनुष्यबळ आणि कित्येक वर्षांपासून रखडलेले पोलीस विभाजनाचे प्रश्न यामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बैठकीकडे नजरा
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, ठाणे तालुक्यातील वाढते नागरीकीकरण व सातत्याने सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीच्या कारवाया, पोलीस ठाण्याच्या विभाजनाचे प्रश्न आदी विषयांवर तातडीने जिल्ह्यातील तालुक्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मनसेचे उपतालुका अध्यक्ष हेमंत मढवी, भूमिपुत्र धर्माभिमानी संघ, ठाणे यांनी जिल्हाधिकार्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे आता सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कधी बैठक घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.