मुंब्रा: वाढत्या वाहनसंख्येमुळे पर्यावरणपूरक वाहतुकीची गरज वाढत आहे. ठाणे आरटीओमध्ये ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान ४,१२० वाहनांची नोंदणी झाली असून, त्यात १४७ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. पेट्रोल वाहनांचे प्रमाण मोठे असल्याने प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ वाहतुकीच्या पर्यायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा दिवसांत २,७७९ मोटारसायकली व स्कूटरची नोंदणी झाली.
त्यापैकी २,७१० पेट्रोल, ६७ इलेक्ट्रिक आणि आठ सीएनजीवरील वाहने आहेत. याशिवाय पाच इलेक्ट्रिक मोपेडची नोंदणी झाली. चारचाकी मोटारींच्या ७८४ नोंदणींपैकी २९५ पेट्रोल, १४१ डिझेल, २७८ पेट्रोल-सीएनजी आणि ७० इलेक्ट्रिक वाहने असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
मालवाहतुकीच्या ३४० वाहनांची नोंदणी झाली असून, त्यात २९८ डिझेल, ३७ सीएनजी, चार पेट्रोल-सीएनजी आणि एका पेट्रोल वाहनाचा समावेश आहे.
याशिवाय बस, मोटर कॅब, प्रवासी व मालवाहू तीनचाकी आणि अन्य व्यावसायिक वाहनांची नोंदणी झाली. यातून पारंपरिक इंधनावरील वाहनांचे वर्चस्व कायम आहे.
एकूण ४,१२० वाहनांपैकी १४७ इलेक्ट्रिक वाहने असून, त्यांचा वाटा सुमारे ३.६ टक्के आहे. दुसरीकडे, ३,००७ पेट्रोल वाहनांची नोंदणी झाली. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी चार्जिंग सुविधांचे जाळे विस्तारणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून स्वच्छ, सुरक्षित वाहतुकीसाठी सहकार्य करावे.- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे