ठाणे: ठाणे शहरातील प्रस्तावित रिंग मेट्रोच्या मार्गावरून आता रहिवाशांकडून तीव्र विरोधाचा सूर उमटू लागला आहे. काही सोसायट्यांच्या समोरून रिंग मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने दैनंदिन वाहतूक, वाहनांची ये-जा, सुरक्षितता आणि परिसरातील शांततेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे ठाण्यातील ईडन वुड्स या कम्प्लेक्सच्या गेटला लागूनच मेट्रोचे स्टेशन येणार असून हे स्टेशन जवळपास ८ माजली असणार आहे. त्यामुळे संपूर्ण कॉम्प्लेक्सच झाकला जाणार असून नागरिकांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे.
रिंग मेट्रोमुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ज्या भागातून हा मार्ग प्रस्तावित आहे, त्या परिसरातील रहिवाशांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे.
विशेषतः सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळून किंवा समोरून मेट्रो मार्ग जाणार असून याच ठिकाणी मेट्रोचे स्टेशन देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामळे कॉम्प्लेक्समधील वाहनांची ये-जा कशी होणार, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची वाहने कशी पोहोचणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरी भागात शांतता मिळावी म्ह्णून ‘कोट्यवधी रुपये खर्चून या ठिकाणी आम्ही घर घेतले, मात्र आता मेट्रोमुळे ही आता शांतता भंग होणार होणार आहे.
या परिसरातील अनेक नागरिकांनी घर घेताना हिरवळ, मोकळी जागा आणि शांत वातावरणाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून फ्लॅट घेतल्यानंतर आता मेट्रोच्या कामामुळे परिसराचे स्वरूप बदलण्याची शक्यता असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे होणारा आवाज, धूळ, वाहतूक व्यवस्थेतील बदल आणि भविष्यातील वर्दळ यामुळे शांतता भंग पावण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
हा परिसर हिरवळीचा आणि शांत असल्यामुळे आम्ही येथे मोठ्या किमतीत घरे घेतली. आता आमच्या सोसायटीसमोरून मेट्रो गेल्यास आमच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होईल. आमच्या गाड्या सोसायटीतून बाहेर कशा काढायच्या, ये-जा कशी करायची, याचा प्रशासनाने विचार करावा, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.
पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी
मेट्रोला आमचा विरोध नसून तिच्या मार्गाच्या नियोजनाला आक्षेप असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो आवश्यक असली तरी त्यासाठी रहिवाशांच्या सुविधा आणि पर्यावरणाचा बळी देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे. शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा, तसेच प्रभावित सोसायट्यांमधील नागरिकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.