Thane Rice Crop pudhari photo
ठाणे

Thane Rice Crop : भातपिकाचा हंगाम लांबला; दाणे भरण्यासाठी पावसाची प्रतीक्षा

ठाणे जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरवर लागवड; १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस महत्त्वाचा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मान्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे यंदा ठाणे जिल्ह्यातील भातपिकाचा हंगाम जवळपास महिनाभर पुढे गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १०२ टक्के पावसाची नोंद झाली असली, तरी सध्या भातपिकाच्या दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आवश्यक ओलाव्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात, विशेषतः १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाची साथ मिळणे भाताच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ४० टक्के क्षेत्रावर हळवा, ५० टक्के क्षेत्रावर निमगवा, तर उर्वरित क्षेत्रावर गवा भाताची लागवड झाली आहे. या तिन्ही प्रकारांचा पक्व होण्याचा कालावधी वेगवेगळा असल्याने त्यांच्या कापणीच्या वेळेतही फरक पडतो.

यंदा पावसाचे आगमन उशिराने झाले. त्यानंतर पावसाची स्थितीही काहीशी विलंबाने स्थिरावल्याने भाताच्या वाढीचे टप्पे पुढे सरकले. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत यंदा भाताचा हंगाम लांबला असून, सध्या पिकाला दाणे भरण्याच्या अवस्थेत आवश्यक पाण्याची प्रतीक्षा आहे.

सध्या जिल्ह्यातील हळवा भात दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हळवा हा कमी कालावधीत तयार होणारा प्रकार असल्याने त्याची पक्वता आणि कापणी तुलनेने लवकर होते. त्यामुळे सध्याच्या अवस्थेत पिकाला आवश्यक ओलावा मिळाल्यास हळव्या भाताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. मात्र, पुढील एक ते दोन आठवड्यांत निमगरवा आणि त्यानंतर गरवा भात दाणे भरण्याच्या अवस्थेत येणार आहे. या काळात पाऊस कमी पडल्यास किंवा दीर्घकाळ उघडीप राहिल्यास या दोन्ही प्रकारच्या भातपिकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भातपिकाच्या वाढीमध्ये दाणे भरण्याचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात पिकाला पुरेसा ओलावा मिळणे आवश्यक असते. पाण्याची कमतरता झाल्यास दाण्यांची पूर्ण वाढ न होणे, दाणे हलके राहणे तसेच अपेक्षित उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. यामुळे यंदा जिल्ह्यात पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असले, तरी त्याचे वितरण आणि योग्य वेळी झालेला पाऊस अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून किमान १५ ऑक्टोबरपर्यंत भातपिकाला आवश्यक ओलावा मिळणे गरजेचे आहे. या काळात पावसाने दडी मारल्यास उशिराने लागवड झालेल्या भातपिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

अखेरच्या टप्प्यातील पाऊस ठरणार महत्त्वाचा

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला, तरी त्यानंतर झालेल्या पावसामुळे भातपिकाची वाढ चांगली झाली आहे. सध्या जिल्ह्यात भातपिकावर मोठ्या प्रमाणात किडी किंवा रोगराईचा प्रादुर्भाव नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पिकाच्या पुढील वाढीसाठी आणि दाणे भरण्याच्या अवस्थेसाठी पावसाची साथ आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खरीप हंगामाचा भात हा प्रमुख आधार आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाचे प्रमाण आणि सातत्य याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हळवा, निमगरवा आणि गरवा या प्रकारांचा पक्वतेचा कालावधी वेगवेगळा असल्याने अखेरच्या टप्प्यातील पाऊस विशेषतः निमगरवा आणि गरवा भातासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस झाला असला, तरी पावसाचे आगमन उशिराने झाल्याने भाताचा हंगाम किमान एक महिना लांबला आहे. सध्या भाताच्या दाणे वाढीचा कालावधी असून, या कालावधीत पाऊस असणे गरजेचे आहे.
रामेश्वर पाचे जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT